जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धर्मरक्षण, संस्कृती रक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेचा जागर करण्यासाठी आज जळगाव शहरातील नेहरू चौक परिसरात ‘विराट हिंदू संमेलन’ अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात संपन्न झाले. सकल हिंदू समाजातर्फे आयोजित या संमेलनात हजारो हिंदू बांधव, भगिनी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून हिंदू एकतेचे दर्शन घडविले.
भव्य शोभायात्रेने झाला प्रारंभ
संमेलनाची सुरुवात सायंकाळी ५:३० वाजता गोलाणी मार्केटमधील श्री हनुमान मंदिरापासून निघालेल्या भव्य शोभायात्रेने झाली. ही यात्रा चित्रा चौक, टावर चौक मार्गे संमेलन स्थळी म्हणजेच नेहरू चौकात पोहोचली. भगवे ध्वज, जय घोषाच्या घोषणा आणि शिस्तबद्ध सहभागामुळे संपूर्ण परिसर हिंदुत्वाच्या रंगात न्हाऊन निघाला होता.

या संमेलनासाठी प्रमुख वक्ते म्हणून पंढरपूर येथील ह.भ.प. निवृत्ती माधव महाराज नामदास उपस्थित होते. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत हिंदू धर्मातील एकता आणि कर्तव्याची जाणीव करून दिली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (धरणगाव) बाळासाहेब चौधरी यांनी संघटन शक्ती आणि राष्ट्रभक्तीवर मोलाचे मार्गदर्शन केले. मंचावर स्वागत समितीचे अध्यक्ष दिलीप गांधी, अजय गांधी आणि डॉ. आरती हुजुरबाजार यांची प्रमुख उपस्थिती होती.
संमेलनादरम्यान वक्त्यांनी हिंदू समाजाच्या अखंडता आणि सशक्तीकरणावर भर दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे स्मरण करून देत, हिंदू समाज अजेय असून संघटित शक्तीसमोर कोणतीही अडचण टिकू शकणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी आ. राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, मनीष झंवर, पीयूष गांधी यांच्यासह जळगाव शहरातील अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि जळगाव जनता बँकेचे संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जोशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार स्वागत समितीचे अध्यक्ष दिलीप गांधी यांनी मानले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध मंडळांनी सहकार्य केले त्यांचा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या स्वयंसेवकांनी सुरक्षा, स्वच्छता आणि नियोजनाची चोख जबाबदारी पार पाडली. नविपेठ आणि जय किसनवाडी परिसरातील नागरिकांचाही यात मोठा सहभाग होता.



