मुंबई-वृत्तसेवा | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे वातावरण तापलेले असतानाच शिवसेना (ठाकरे गट) मध्येही अंतर्गत हालचाली वेगाने सुरू झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
दिल्लीमध्ये खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी नुकतीच ठाकरे गटाच्या खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्षांतर्गत नाराजी उफाळून आल्याची माहिती समोर येत आहे. अनेक खासदारांनी थेट वरिष्ठ नेतृत्वासमोर आपली नाराजी व्यक्त केली. विशेषतः, उद्धव ठाकरे खासदारांना पुरेसा वेळ देत नाहीत, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाकडून अपेक्षित पाठबळ मिळाले नाही, अशा तक्रारी करण्यात आल्या.

यावेळी काही खासदारांनी नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती किंवा इतर कारणांमुळे काही मर्यादा असतील, तर आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रभर सक्रिय का नाहीत? असा थेट सवालही उपस्थित करण्यात आला. त्यामुळे पक्षातील अस्वस्थता उघडपणे समोर आल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगू लागली होती. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावल्याचे सांगितले जात आहे.
आज झालेल्या बैठकीनंतर मात्र पक्षाकडून सर्व काही सुरळीत असल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही, या घडामोडींमुळे ठाकरे गटातील अंतर्गत समीकरणे आणि आगामी राजकीय रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



