चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरीमध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ८ लाख ६ हजार ५०० रुपयांचा ऐवजी लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र तुळशीराम वाघ (वय ६१) हे आपल्या कुटुंबासह बुधगाव येथे राहतात. २१ मार्च च्या मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास, वाघ यांची पत्नी मंगलबाई यांना कपाट उघडल्याच्या आवाजाने अचानक जाग आली. त्यांनी उठून पाहिले असता, कपाटाजवळ एक पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला, उंच व सडपातळ शरीरयष्टीचा अज्ञात इसम दिसून आला. घरच्यांना जाग आल्याचे लक्षात येताच चोरटा तिथून पसार झाला.

चोरट्याने घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला होता. घरातील कपाटाचे लॉक तोडून त्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि ५ हजार रुपयांची रोकड असा सुमारे ८ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीच्या घटनेनंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अंधाराचा फायदा घेऊन तो पळून जाण्यात यशस्वी झाला. घटनेची माहिती मिळताच चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे



