जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण लेवा पाटीदार समाजासाठी अभिमानाचा क्षण ठरत, कु. नंदिनी संजीव पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) प्रतिष्ठित परीक्षेत ऑल इंडिया रँक ५१२ मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्याचे नाव देशपातळीवर झळकले असून, तरुण पिढीसाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नंदिनी पाटील यांच्या यशाचे कौतुक करत हे यश संपूर्ण समाजासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. लेवा पाटीदार समाज हा कष्टाळूपणा, शिक्षणनिष्ठा आणि प्रगतीशील विचारसरणीसाठी ओळखला जातो, आणि नंदिनी यांनी या परंपरेला नवी उंची दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी मोठी स्वप्ने पाहून जिद्द, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

कु. नंदिनी पाटील या लेवा पाटीदार समाजातून UPSC उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्याच मुलगी ठरल्या असून, हा क्षण समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर हे यश मिळवले. त्यांच्या या यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा असून, त्यांचे वडील संजीव देविदास पाटील आणि आई सौ. शिल्पा संजीव पाटील हे जळगाव येथे खाजगी क्लासेसच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य करत आहेत.
दरम्यान, जळगाव येथे नंदिनी पाटील यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, नगरसेवक पियुष कोल्हे, कुंदन काळे, आशुतोष पाटील, प्रवीण कोल्हे, उद्योजक किशोर डालू ढाके, भरत धर्मा खडके, ज्ञानेश्वर गोपाळ भोळे, तुषार महाजन तसेच स्वीय सहाय्यक हेमंत नारखेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कु. नंदिनी पाटील यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशामुळे जळगाव जिल्ह्याचा आणि लेवा पाटीदार समाजाचा गौरव अधिक वृद्धिंगत झाला आहे.



