यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक जपत ईदगाह मैदानावर शेकडो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे शहरात बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले.
रमजान महिनाभर उपवास (रोजे) केल्यानंतर चंद्रदर्शनानंतर साजऱ्या होणाऱ्या ईद उल फित्रच्या निमित्ताने २१ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ईदगाह मैदानावर मौलाना शमीउल्ला अब्दुल कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नमाज अदा करण्यात आली. या वेळी मुस्लिम बांधवांनी पारंपरिक व आकर्षक पोशाख परिधान करून नमाज अदा केली. नमाजनंतर सर्वांनी एकमेकांना गळाभेट देत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या.

ईद उल फित्र हा सण संयम, शिस्त, त्याग आणि दानशूरतेचे प्रतीक मानला जातो. अल्लाहने दिलेल्या शक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असून, समाजात प्रेम, एकता आणि सौहार्द वाढविण्याचा संदेश या सणातून दिला जातो. यावलमध्येही याच भावनेतून हा सण साजरा करण्यात आला.
या प्रसंगी शहरातील विविध मान्यवरांनी ईदगाह मैदानावर उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, नगरसेवक रूबाब तडवी, सागर चौधरी, पराग सराफ, उमर कच्छी, निसार शेख तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत पार पडला.



