Home क्रीडा महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय निसर्गोपचार समितीची घोषणा !

महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय निसर्गोपचार समितीची घोषणा !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निरोगी समाजासाठी योग आणि निसर्गोपचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हेच सूत्र समोर ठेवून, ‘महाराष्ट्र योग शिक्षक संघा’तर्फे एका महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. दि.२८ फेब्रुवारी रोजी आयोजित दिमाखदार योग संमेलनात संघांतर्गत ‘राज्यस्तरीय निसर्गोपचार समिती’ची स्थापना करण्यात आली असून, या समितीच्या अध्यक्षपदी धुळे येथील प्रा. सोनल महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

दिग्गजांचे मार्गदर्शन आणि नियोजन :
महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थापक सदस्य प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली या समितीची रचना करण्यात आली आहे. तसेच, संघाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष डॉ. कृणाल महाजन यांच्या विशेष प्रयत्नातून आणि नियोजनातून ही निसर्गोपचार तज्ज्ञ समिती आगामी काळात कार्य करणार आहे.

या नवीन समितीच्या माध्यमातून योगशास्त्रासहित निसर्गोपचाराचा प्रचार आणि प्रसार राज्यभर अधिक प्रभावीपणे केला जाणार आहे. प्रा. सोनल महाजन यांच्या नेतृत्वाखाली एकूण ११ निष्णात सदस्यांची या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. यात पुणे, मुंबई, जळगाव, भुसावळ आणि धुळे अशा विविध भागांतील तज्ज्ञांचा समावेश आहे.

नवनियुक्त सदस्य कार्यकारिणी खालीलप्रमाणे:
पुणे येथून मोरेश्वर पाठक, कल्याण-मुंबईतून स्वप्नाली गर्गे, जळगावचे डॉ. कल्पेश गांधी व प्रकाश बारी, भुसावळचे विवेक गवळी, पाचोऱ्याचे महेंद्र खरे, चाळीसगावच्या विद्या कुलकर्णी, शिरसोलीच्या योगिता सावंत, जामनेरमधील निलेश वाघ, एरंडोलचे मोहसीन खाटीक आणि सावखेडा येथील अनंत सुरेश महाजन यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

समितीचा कार्यकाळ आणि उद्दिष्टे
नवनियुक्त निसर्गोपचार समितीचा कार्यकाळ १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ असा राहणार आहे. निसर्गोपचाराचा प्रचार-प्रसार करणे, सामान्यांना नैसर्गिक उपचार पद्धतीची माहिती देणे आणि योग व निसर्गोपचार यांची सांगड घालून आरोग्यदायी जीवनशैली रुजवणे हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.

निसर्गोपचार समितीच्या स्थापनेमुळे योग शिक्षकांना आता नैसर्गिक उपचार पद्धतींचे अधिक सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे नवनियुक्त अध्यक्षा प्रा. सोनल महाजन आणि त्यांच्या संपूर्ण ११ सदस्यीय टीमचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यात ही समिती ग्रामीण आणि शहरी भागात निसर्गोपचाराचे शिबिरे आणि कार्यशाळा आयोजित करून जनजागृती करणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.


Protected Content

Play sound