Home Cities जळगाव जळगावात गुढीपाडवा निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन; भगव्या झेंड्यांतून देशभक्तीचा संदेश

जळगावात गुढीपाडवा निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन; भगव्या झेंड्यांतून देशभक्तीचा संदेश


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जळगाव शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पारंपरिक गणवेशात भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातून काढण्यात आलेल्या या संचलनात स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध रचनेतून आणि बँडच्या तालावर भगवे झेंडे फडकवत देशभक्ती, संघटन आणि एकतेचा संदेश दिला.

क्रांती चौक, हमालवाडा येथील हनुमान मंदिर परिसरातून या पथसंचलनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मिर्झा चौक, दालफड, श्री मोटर्स मार्गे शिवाजी नगरातील विविध गल्लीबोळांतून संचलन मार्गक्रमण करत डॉ. केशव हेडगेवार बगीचा येथे समारोप करण्यात आला. संचलनादरम्यान स्वयंसेवकांच्या एकसुरी पावलांचा ताल, पारंपरिक गणवेश आणि शिस्तबद्ध मांडणी नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.

या पथसंचलनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मार्गातील विविध ठिकाणी स्वयंसेवकांवर फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. परिसरात भगवामय वातावरण निर्माण झाले असून, देशभक्तीचा जाज्वल्य उत्साह सर्वत्र दिसून येत होता.

संचलनानंतर डॉ. केशव हेडगेवार बगीचा येथे बौद्धिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये स्वयंसेवकांना राष्ट्रसेवा, संघटन आणि सामाजिक बांधिलकी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गुढीपाडवा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती म्हणूनही साजरा केला जातो, यामुळे या दिवसाला संघासाठी विशेष महत्त्व आहे.


Protected Content

Play sound