Home क्राईम केळी पिक विमा घोटाळा उघड ; रावेरमध्ये चार जणांवर गुन्हा दाखल

केळी पिक विमा घोटाळा उघड ; रावेरमध्ये चार जणांवर गुन्हा दाखल


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केळी पिक विमा योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याने रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सुमारे चार कोटी रुपयांहून अधिक रकमेची अफरातफर झाल्याचा आरोप असून या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आणखी दोन संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.

तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जयेश संजय कोळी (रावेर), विजय सोपान पाटील (तामसवाडी), प्रफुल्ह रमेश सराफ (रावेर) आणि हर्षल वाळू पाटील (आटवडा) यांचा समावेश आहे. याशिवाय आणखी दोन संशयितांविरोधात निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

शासनाची फळ पिक विमा योजना ही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राबविली जाते. मात्र या योजनेचा गैरफायदा घेत काही व्यक्तींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रत्यक्षात केळी पिक नसतानाही विमा रक्कम उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे.

तपासादरम्यान या घोटाळ्यामागे संगनमताने कार्य करणारे ‘सिंडीकेट’ सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हा घोटाळा अधिक व्यापक स्वरूपाचा असण्याची शक्यता वर्तवली जात असून पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची चिन्हे आहेत.

पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून संबंधित कागदपत्रांची छाननी सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. यासोबतच शासनाच्या योजनांमध्ये पारदर्शकता राखण्याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.


Protected Content

Play sound