Home Cities जळगाव दीपनगर औष्णिक केंद्रात कंत्राटदारावर आर्थिक लुटीचे आरोप ; निळे निशाण कामगार संघटनेची...

दीपनगर औष्णिक केंद्रात कंत्राटदारावर आर्थिक लुटीचे आरोप ; निळे निशाण कामगार संघटनेची चौकशीची मागणी


दिपनगर, ता. भुसावळ -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत कंत्राटदार संस्थेकडून कामगारांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप करत निळे निशाण कामगार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर येथे एस.पी. इंटरप्राईजेस या कंत्राटदार संस्थेकडून मागील दहा वर्षांपासून कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या संदर्भात १८ मार्च २०२६ रोजी निळे निशाण सामाजिक संघटना प्रणित निळे निशाण कामगार संघाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कामगारांची आर्थिक लूट, पगारातील तफावत आणि मानसिक छळ याबाबत गंभीर मुद्दे निवेदनात मांडण्यात आले आहेत.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही मुख्य अभियंता, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र यांच्याकडे तोंडी व लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच एस.पी. इंटरप्राईजेसकडून होत असलेल्या गैरप्रकारांबाबत ठोस पुरावे सादर करण्यात आले होते. तरीदेखील अद्यापपर्यंत कोणतीही ठोस चौकशी किंवा कारवाई करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे मुख्य अभियंत्यांनी कामगारांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात लेखी पत्र दिले असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे. मात्र त्यानंतरही प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यातील संभाव्य आर्थिक संबंधांबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

निवेदनामध्ये एस.पी. इंटरप्राईजेस या संस्थेची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मागील आठ ते दहा वर्षांपासून कामगारांच्या पगारातील फरक शासन नियमानुसार त्वरित अदा करावा, अशीही ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.

हे निवेदन निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले. यावेळी भुसावळ तालुका अध्यक्ष दीपक लोहार, कामगार तालुका अध्यक्ष आकाश सपकाळे, रवींद्र बाविस्कर तसेच अनेक कामगार उपस्थित होते.


Protected Content

Play sound