Home Cities जळगाव दिव्यांगांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात

दिव्यांगांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिव्यांग उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव येथे जिल्हास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विविध नामांकित कंपन्यांच्या सहभागामुळे आणि शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलमुळे मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि सेंट्रल युथ फॉर जॉब फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा बुधवार, दि. 18 रोजी सकाळी 10 वाजता जीएस ग्राउंडजवळील शासकीय तांत्रिक महाविद्यालय परिसरात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास जळगाव संदीप गायकवाड, कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी अख्तर तडवी, दिव्यांग हेतू संस्था मुंबईचे आर.सी. राऊत व रिगन कुमार, युथ फॉर जॉबचे जिल्हा समन्वयक विकास चौधरी, तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे विजय सैंदाणे व विकास सैंदाणे उपस्थित होते. मान्यवरांनी दिव्यांग उमेदवारांना रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्याचे आणि कौशल्य विकासावर भर देण्याचे आवाहन केले.

मेळाव्यात विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवून दिव्यांग उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्याचबरोबर विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉलही उभारण्यात आले होते, ज्यामुळे उमेदवारांना रोजगारासोबतच स्वावलंबनाच्या दिशेने मार्गदर्शन मिळाले.

या मेळाव्यासाठी सुमारे 70 ते 80 दिव्यांग उमेदवारांनी नोंदणी केली होती. उपस्थित उमेदवारांनी विविध कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्या तसेच तज्ज्ञांकडून करिअर मार्गदर्शन घेतले. आयोजकांच्या मते, अशा उपक्रमांमुळे दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यास आणि त्यांच्या आत्मनिर्भरतेस चालना देण्यास मदत होणार आहे.


Protected Content

Play sound