Home क्राईम क्रिकेटच्या वादातून राडा! बाप-लेकावर बॅटने जीवघेणा हल्ला; तिघांवर गुन्हा

क्रिकेटच्या वादातून राडा! बाप-लेकावर बॅटने जीवघेणा हल्ला; तिघांवर गुन्हा


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील वांजोळा रोड परिसरात क्रिकेट खेळण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांनी मिळून बापलेकावर क्रिकेटची बॅट आणि हातातील कड्याने जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी सोमवारी १६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील लक्ष्मी नगर, वांजोळा रोड परिसरात गोपाळ रविंद्र बारी वय ४० हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. १४ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी गोपाळ रवींद्र बारी (वय-४०) यांचा मुलगा आणि आरोपी यांच्यात क्रिकेट खेळण्यावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून तिघांनी गोपाळ बारी यांच्या घरासमोर येऊन राडा केला.

संशयित आरोपी उमेश विकास धनगर, ओम विकास धनगर आणि रंजना विकास धनगर यांनी संगनमत करून गोपाळ बारी, त्यांचा मुलगा ध्रुव आणि वडील रवींद्र बारी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी तिघांनी क्रिकेटची बॅट आणि हातातील कड्याचा वापर करून फिर्यादींना जखमी केले. इतकेच नव्हे तर, “तुमच्या मुलाला मारून टाकू” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी गोपाळ बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे उमेश विकास धनगर, ओम विकास धनगर आणि रंजना विकास धनगर सर्व रा. लक्ष्मी नगर, भुसावळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound