सोलापूर- वृत्तसेवा । राज्यात सुरू असलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षांदरम्यान सांगोला येथे अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उद्या होणाऱ्या भूगोल विषयाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका थेट स्ट्राँग रूम फोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली असून, परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यात आधीच पेपरफुटी आणि कॉपीच्या घटना वाढत असताना हा प्रकार अधिक चिंताजनक मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी बारावीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने परीक्षा व्यवस्थेवर टीका होत होती. अशातच आता दहावीच्या पेपरची थेट चोरी झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.

सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर येथे बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम तयार करण्यात आली होती. याच ठिकाणी ठेवलेल्या भूगोल विषयाच्या सुमारे ५० प्रश्नपत्रिका अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अधिकारी तेथे पोहोचले असता स्ट्राँग रूमचे कुलूप तोडलेले दिसून आले.
शिक्षण विभाग आणि कस्टडियन अधिकारी कालच्या उरलेल्या प्रश्नपत्रिका बोर्डाकडे पाठवण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर आणखी धक्कादायक बाब समोर आली. स्ट्राँग रूमबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे चोरी करणाऱ्यांचे कोणतेही फुटेज मिळू शकले नाही.
याशिवाय, त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी नियुक्त केलेला पोलीस कर्मचारी घटनेच्या वेळी नेमका कुठे होता, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सुरक्षेतील या मोठ्या त्रुटींमुळे संपूर्ण यंत्रणा चौकशीच्या भोवऱ्यात सापडली आहे.
घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, डीवायएसपी बसवराज शिवपुजे आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी तातडीने तपास सुरू केला असून, संबंधित पोलीस कर्मचारी आणि जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले आहे.
या प्रकारामुळे उद्या होणाऱ्या दहावीच्या भूगोल परीक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रश्नपत्रिका लीक झाल्याची शक्यता लक्षात घेता, परीक्षा पुढे ढकलली जाईल का किंवा नव्या प्रश्नपत्रिका तयार केल्या जातील का, याबाबत शिक्षण विभागाकडून अद्याप स्पष्ट निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
या घटनेने राज्यातील परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड केल्या असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.



