तेल अवीव- वृत्तसेवा । मध्यपूर्वेत तणाव वाढत असताना इस्रायलने इराणविरुद्ध मोठी कारवाई केल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी थेट फोनवरून आदेश दिल्यानंतर इराणच्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात इराणच्या बासीज दलाचे कमांडर गुलामरेझा सोलेमानी ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
मंगळवारी (१७ मार्च) इस्रायल सरकारकडून सोशल मीडियावर एक फोटो शेअर करण्यात आला. या फोटोमध्ये नेतन्याहू फोनवर बोलताना दिसत असून, त्यांच्या शेजारी लष्करी अधिकारी उपस्थित असल्याचे स्पष्ट होते. या दृश्यामुळे कारवाई थेट पंतप्रधानांच्या आदेशानुसार झाल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, नेतन्याहू यांच्याबाबत काही अफवा पसरत असतानाच हा फोटो प्रसिद्ध करण्यात आला.

इस्रायल डिफेन्स फोर्सने (IDF) स्वतंत्र पोस्टद्वारे इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याचे स्पष्ट केले आहे. बासीज दलाचे प्रमुख असलेले सोलेमानी गेल्या सहा वर्षांपासून या पदावर कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूमुळे इराणच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाली आहे.
याच कारवाईत इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांनाही लक्ष्य करण्यात आल्याचा दावा इस्रायलने केला आहे. मात्र, लारीजानी यांचा मृत्यू झाला आहे की ते जखमी आहेत, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या हल्ल्याच्या परिणामांबाबत अनिश्चितता कायम आहे.
या घटनांमुळे इस्रायल-इराण संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही देशांमध्ये आधीच वाढलेला तणाव आता अधिक चिघळू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायही या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.



