Home Cities जळगाव जळगावात गुढी पाडव्याचे सामूहिक स्वागत; हिंदू जनजागृती समितीचा विशेष उपक्रम

जळगावात गुढी पाडव्याचे सामूहिक स्वागत; हिंदू जनजागृती समितीचा विशेष उपक्रम


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचे प्रतीक असलेल्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने हिंदू जनजागृती समितीच्या वतीने विविध ठिकाणी सामूहिक गुढी पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्षाचे स्वागत एकत्रितपणे करत समाजात सकारात्मक विचार, एकजूट आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गुढी पाडव्याच्या पावन दिवशी सामूहिक गुढी पूजन करत नववर्षाचे स्वागत करण्याची परंपरा जपण्याबरोबरच समाजात संघटितपणाची भावना निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. या कार्यक्रमादरम्यान नागरिकांकडून पर्यावरण संरक्षण, परिसर स्वच्छ ठेवणे, तसेच कॉलनीतील हिंदूंनी परस्परांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राखत संघटित राहण्याचे संकल्प घेतले जाणार आहेत.

तसेच निरोगी आणि संतुलित जीवनशैलीसाठी नियमित योगा, प्राणायाम आणि व्यायाम करण्याचा संकल्पही नागरिकांकडून करण्यात येणार आहे. नववर्षाच्या प्रारंभी सकारात्मक आणि समाजहिताचे संकल्प करून नव्या वर्षाची सुरुवात करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. हिंदू जनजागृती समितीच्या या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून अनेकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.

शहरातील विविध भागांमध्ये सामूहिक गुढी पूजनाचे आयोजन करण्यात आले असून चौघुले प्लॉट, वाल्मीक चौक, लक्ष्मीनगर (गेंदालाल मिल), ज्ञानदेव नगर चौक, पांझरापोळ चौक, के. सी. पार्क, मयूर कॉलनी पिंप्राळा, मेहरूण, छत्रपती शिवाजीनगर येथील मारुती मंदिर, सुप्रीम कॉलनी, पिंप्राळा, श्रीधर नगर, श्रीराम नगर रामेश्वर कॉलनी, व्यंकटेश नगर आणि देविदास कॉलनी या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शहरातील नागरिकांना या सामूहिक गुढी पूजन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर यांनी केले आहे.

 


Protected Content

Play sound