भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपालिकेत सध्या राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांच्या वर्तणुकीबाबत भाजप आणि महायुतीच्या नगरसेवकांनी थेट पोलीस अधिक्षकांकडे धाव घेतली आहे. नगरपालिकेत सध्या सुरू असलेल्या ‘दादागिरी’ विरोधात कारवाई करण्याची आणि आगामी सभेला कडेकोट पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पोलीसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १३ फेब्रुवारी रोजी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना, भाजप गटाच्या नगरसेवकांनी सभेचे इतिवृत्त लिहिणे आणि विषयांवर हात उंचावून मतदान घेण्याची मागणी केली. यावेळी स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांनी आरडाओरड करत खोटे आरोप केल्याचे निवेदनात म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, उपनगराध्यक्ष शैलजा पुरषोत्तम नारखेडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचाही अपमान करण्यात आल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी केला आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उल्लेख :
नगरसेवकांनी दिलेल्या तक्रारीत संतोष चौधरी यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरही बोट ठेवले आहे. चौधरींवर खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांनी शिक्षाही भोगली आहे, असे निवेदनात नमूद आहे. पालिकेच्या परिसरात अंदाजे ५० गुंड प्रवृत्तीचे लोक जमवून नगरसेवकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
उद्याच्या सभेवर टांगती तलवार :
येत्या १७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता तहकूब झालेली सभा पुन्हा होणार आहे. या सभेदरम्यान पुन्हा हिंसक घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे, पालिकेच्या आवारात अनधिकृत गर्दीला मज्जाव करावा, संतोष चौधरी यांना लेखी समज द्यावी आणि सभागृहात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशी आग्रही मागणी भाजप व महायुतीच्या ३३ हून अधिक नगरसेवकांनी केली आहे. आता पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि उद्याची सभा शांततेत पार पडते का, याकडे संपूर्ण भुसावळ शहराचे लक्ष लागले आहे.
याप्रसंगी भाजपचे गटनेते युवराज लोणारी, नगरसेविका पुजा तायडे, गिरीश महाजन, महेंद्र ठाकूर, महिमा नागराणी, अर्चना सातदिवे, आशिष पटेल, प्रकाश बतरा, शोभा इंगळे, आशा पटेल, सोनल महाजन, सोनम इंगळे, छाया फालक, विशाल नाटकर, नितीन धांडे, प्रिती पाटील, डॉ. प्रसाद बोंडे, अनिता सपकाळे यांच्यासह आदी नगरसेवक उपस्थित होते.



