भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी उसळली आहे. विशेषतः रमजानच्या २५व्या रोजानिमित्त विविध खाद्यपदार्थ, कपडे आणि धार्मिक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारात दाखल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.
रमजान महिन्यात रोजा सोडताना लागणाऱ्या विविध खाद्यपदार्थांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. काजू, बदाम, पिस्ता, खजूर यांसारख्या सुका मेव्याला विशेष मागणी असून विविध प्रकारचे शरबत, मिठाई आणि इफ्तारसाठी लागणारे खाद्यपदार्थ विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात आले आहेत. दुकानदारांनीही रमजानच्या निमित्ताने विशेष तयारी करत विविध वस्तूंची आकर्षक मांडणी केली आहे.

भुसावळ शहरातील खडका रोड, रजा चौक, अमरदीप चौक या भागांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी वर्दळ दिसून आली. सायंकाळच्या वेळेनंतर बाजारपेठेत गर्दी आणखी वाढत असून कपडे, अत्तर, टोपी तसेच धार्मिक वापराच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी दुकाने गजबजून टाकली आहेत. विशेषतः तरुणाई आणि कुटुंबीय मोठ्या उत्साहाने खरेदी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, रमजान महिन्याच्या निमित्ताने शहरातील अनेक मशिदींमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रंगीबेरंगी दिव्यांनी सजलेली मशिदी आणि बाजारपेठांतील प्रकाशझोत यामुळे शहरात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत नागरिक बाजारपेठेत फिरताना आणि खरेदी करताना दिसत असल्याने व्यापाऱ्यांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.
रमजान महिन्यातील शेवटच्या दिवसांकडे वाटचाल सुरू असताना बाजारपेठांमध्ये वाढलेली गर्दी आणि खरेदीचा उत्साह यामुळे भुसावळ शहरात सणाचा माहोल निर्माण झाला आहे. विशेषतः २५व्या रोजाच्या निमित्ताने सुका मेवा, कपडे आणि अत्तर खरेदीला ग्राहकांनी दिलेले प्राधान्य हे बाजारपेठेतील गजबज वाढवणारे ठरत आहे.



