पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन हद्दीत वरसाडे तांडा येथे प्रेमसंबंधातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय भिमा राठोड (वय ३३) यांनी सांगितले की, त्यांचा भाऊ विजय भिमा राठोड (वय २५, मजुरी) २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११.३० ते २५ फेब्रुवारी पहाटे ४ वाजेदरम्यान घरातून बाहेर गेला आणि परत आला नाही. त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेतल्यावरही तो सापडला नाही, म्हणून पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनमध्ये २६ फेब्रुवारी रोजी मिसिंग रजिस्टर क्रमांक १५/२०२६ नुसार बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. या प्रकरणात तांत्रिक माहितीच्या आधारे संजय परशुराम जाधव याची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांच्या सखोल चौकशीत त्याने धक्कादायक माहिती उघडकीस आणली.

तपासात समोर आले की, संजय जाधव याची पत्नी सोनाली संजय जाधव आणि मृतक विजय राठोड यांच्यात प्रेमसंबंध होते. विजय राठोडने सोनालीचे काही अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये काढले आणि त्याच्या माध्यमातून तिला धमकावत होता. या बाबीचा संशय आणि संताप लक्षात येताच, संजय जाधव आणि त्याची पत्नी सोनाली यांनी मिळून विजय राठोड याची हत्या केली व मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली.
या प्रकरणी पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, पाचोरा न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करीत आहेत. कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपासात पो.उप.नि. विठ्ठल पवार, पो. हे. कॉ. किरण ब्राम्हणे, अतुल पवार, अभिजित निकम, राहुल बेहरे, पांडुरंग गोरबंजार, अमोल पाटील, नामदेव इंगळे, भारत पाटील, दीपक अहीरे आणि सागर पाटील यांनी महत्त्वाचे सहकार्य केले आहे. ही घटना प्रेमविवादातून झालेल्या हिंसाचाराचे गंभीर उदाहरण असून, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चकिती आणि काळजी पसरली आहे.



