जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डोळ्यांतील तिरळेपणा (स्क्विंट) आणि पडलेली पापणी या समस्यांमुळे अनेकांना दृष्टीसंबंधित अडचणींसोबतच मानसिक संकोचालाही सामोरे जावे लागते. मात्र अशा रुग्णांसाठी आता दिलासादायक संधी उपलब्ध झाली आहे. पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठान, पुणे यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम जळगावात येणार असून गरजू रुग्णांसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या विशेष वैद्यकीय उपक्रमांतर्गत तिरळेपणा तसेच पडलेली पापणी (Ptosis) या डोळ्यांच्या विकारांवर उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. हे शिबिर जळगाव येथे दि. ३, ४ आणि ५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले असून यामध्ये तज्ज्ञ नेत्ररोगतज्ज्ञांकडून रुग्णांची तपासणी करून पुढील उपचाराची दिशा निश्चित केली जाणार आहे.

पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठानच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने देशभरात यापूर्वी तिरळेपणावर आधारित १९८ हून अधिक शिबिरे यशस्वीपणे पार पाडली आहेत. या कार्याची दखल घेत लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच आशिया रेकॉर्डमध्येही या उपक्रमाची नोंद करण्यात आली आहे. या टीमने अनेक गरजू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून त्यांची दृष्टी सुधारण्यास मदत केली आहे.
जळगावात होणारे हे शिबिर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच उपचारांपासून वंचित राहिलेल्या रुग्णांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. तिरळेपणा किंवा पडलेली पापणी यांसारख्या समस्यांमुळे लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत अनेकांना त्रास सहन करावा लागतो. योग्य वेळी उपचार झाल्यास या समस्या पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात, असे डॉक्टरांचे मत आहे.
शिबिरासाठी नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून गरजू रुग्णांनी लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणीसाठी इच्छुकांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे संपर्क साधावा, तसेच ७०२८३०३४२३ आणि ९१७५८३००७६ या क्रमांकांवर संपर्क करून आपली नोंदणी निश्चित करावी.
या शिबिराच्या माध्यमातून डोळ्यांच्या गुंतागुंतीच्या समस्यांवर मोफत तपासणी व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध होत असल्याने अनेक गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा संदेश जास्तीत जास्त गरजूंंपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.



