Home Cities मुक्ताईनगर सावदा पोलीस निरीक्षक अडचणीत; खडसेंची हक्कभंग सूचना विधान परिषदेत स्वीकारली

सावदा पोलीस निरीक्षक अडचणीत; खडसेंची हक्कभंग सूचना विधान परिषदेत स्वीकारली


मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या विरोधात लोकप्रतिनिधींशी उद्धट वर्तन केल्याचा आरोप करत आमदार एकनाथराव खडसे यांनी मांडलेली विशेषाधिकार भंगाची सूचना विधान परिषदेत स्वीकारण्यात आली आहे. सभापतींनी ही सूचना मान्य केल्यामुळे या प्रकरणाची आता अधिकृत चौकशी होणार असून प्रकरण विधान परिषदेत चर्चेचा विषय ठरणार आहे.

रावेर तालुक्यातील तासखेडा शिवारात हतनूर कालव्याच्या मातीची मोठ्या प्रमाणात अवैध चोरी झाल्याचा मुद्दा आमदार एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात उपस्थित केला होता. या प्रकरणात तब्बल ४५६५ ब्रास मातीची चोरी झाल्याचे शासनानेही मान्य केले असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात माती चोरीचा प्रकार उघडकीस येऊनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.

या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार खडसे ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सावदा पोलीस स्टेशन येथे गेले होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी त्यांच्याशी अपमानास्पद व उद्धट पद्धतीने वर्तन केल्याचा आरोप विशेषाधिकार भंगाच्या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. “तपास सुरू आहे, तुमचा हस्तक्षेप नको,” असे मोठ्या आवाजात सांगत लोकप्रतिनिधींना सन्मानाने वागविण्याच्या शासन निर्णयाचे उल्लंघन केल्याचे खडसे यांनी नमूद केले आहे.

तसेच या घटनेदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन आपली दीर्घ राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही आमदार खडसे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचा अवमान झाल्याचे त्यांनी विधान परिषदेत नमूद केले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विधान परिषदेच्या सभापतींनी आमदार खडसे यांनी मांडलेली विशेषाधिकार भंगाची सूचना स्वीकारली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण विधान परिषद विशेषाधिकार समितीकडे चौकशीसाठी पाठविण्यात येणार आहे. समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली असून पुढील चौकशी अहवालात नेमके काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील संबंधांबाबतही या प्रकरणामुळे नवी चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 


Protected Content

Play sound