Home टेक्नोलॉजी एलपीजीला पर्याय सापडला? पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा ; 20 वर्षांच्या संशोधनानंतर DME गॅस...

एलपीजीला पर्याय सापडला? पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा ; 20 वर्षांच्या संशोधनानंतर DME गॅस निर्मितीत यश


पुणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीमुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होत असताना पुण्यातील शास्त्रज्ञांनी एलपीजीला पर्याय ठरू शकणाऱ्या ‘डायमिथाईल इथर’ (DME) गॅसच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण यश मिळवल्याचा दावा केला आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) मधील संशोधकांनी तब्बल 20 वर्षांच्या संशोधनानंतर हा पर्याय विकसित केला असून भविष्यात यामुळे एलपीजीवरील परदेशी अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते.

सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठा साखळीवरही परिणाम होत असल्याचे दिसत आहे. या परिस्थितीत जगभरात एलपीजी गॅसची टंचाई जाणवू लागली असून भारतासह अनेक देशांमध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या उपलब्धतेवर दबाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील संशोधन संस्थेने विकसित केलेला पर्याय महत्त्वाचा मानला जात आहे.

नॅशनल केमिकल लॅबोरेटरीतील शास्त्रज्ञ डॉ. तिरुमलाईवामी राजा आणि त्यांच्या संशोधकांच्या टीमने विशेष उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट) विकसित करून डायमिथाईल इथर म्हणजेच DME गॅस तयार करण्यात यश मिळवले आहे. या उत्प्रेरकाच्या साहाय्याने प्रयोगशाळेत DME गॅसचे उत्पादन शक्य झाले असून सध्या पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून दररोज सुमारे अडीचशे किलो गॅस तयार केला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संशोधकांच्या मते, औद्योगिक कंपन्यांसोबत करार करून या गॅसचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाल्यास तो एलपीजीमध्ये सुमारे 8 टक्क्यांपर्यंत मिसळता येऊ शकतो. त्यामुळे स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या वापरात मोठी बचत होण्यास मदत होईल. याशिवाय हा गॅस स्वतंत्रपणेही वापरता येण्याची शक्यता असल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

DME गॅसची एक महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे तो एलपीजीपेक्षा अधिक स्वच्छ मानला जातो. या गॅसची ज्वाला पारदर्शक असल्याने त्यातून प्रदूषण कमी होते आणि तो तुलनेने पर्यावरणपूरक ठरतो. त्यामुळे भविष्यात स्वच्छ ऊर्जा पर्याय म्हणून त्याचा विचार केला जाऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाल्यास या गॅसची किंमत एलपीजीपेक्षा कमी राहू शकते, असा विश्वासही शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

भारतामध्ये दरवर्षी सुमारे 31.3 दशलक्ष टन एलपीजीचा वापर केला जातो. त्यापैकी जवळपास 87 टक्के गॅस घरगुती स्वयंपाकासाठी वापरला जातो. मात्र देशाच्या एकूण एलपीजी गरजांपैकी सुमारे 62 टक्के गॅस आयातीवर अवलंबून आहे. विशेष म्हणजे या आयातीपैकी 85 ते 90 टक्के पुरवठा होर्मुझ सामुद्रधुनी मार्गे होतो. आंतरराष्ट्रीय संघर्षांमुळे या मार्गावर अडथळे निर्माण झाल्यास भारताच्या गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित केलेला DME गॅस भविष्यात भारतासाठी महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. औद्योगिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाल्यास एलपीजीवरील अवलंबित्व कमी होऊन ऊर्जा सुरक्षेला बळकटी मिळू शकते.


Protected Content

Play sound