Home Cities अमळनेर रणाईचे-भरवस महानुभाव तीर्थक्षेत्र विकासाला चालना ; 2 कोटी 90 लाखांचा निधी मंजूर

रणाईचे-भरवस महानुभाव तीर्थक्षेत्र विकासाला चालना ; 2 कोटी 90 लाखांचा निधी मंजूर


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील रणाईचे आणि भरवस येथील महानुभाव पंथाच्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने 2 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून मंदिर परिसरातील सभामंडप, डोम बांधकाम, सुशोभीकरण तसेच पर्यटनविषयक विविध विकासकामांना गती मिळणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन सांस्कृतिक विभागाकडून 11 मार्च रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश प्राप्त झाले असून त्यामध्ये रणाईचे भरवस येथील देवस्थानांच्या विकासकामांचा समावेश करण्यात आला आहे. या निधीतून रणाईचे येथील महानुभाव पंथाचे श्रीकृष्ण मंदिर परिसरात सभामंडप बांधण्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी आणखी 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय मंदिर परिसरात सभामंडप डोम बांधकामासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच भरवस येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरात पर्यटनविषयक विविध विकासकामांसाठी 40 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून अशा प्रकारे एकूण 2 कोटी 90 लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.

अमळनेर तालुका तसेच मतदारसंघात रणाईचे आणि भरवस ही दोन्ही ठिकाणे महानुभाव पंथासाठी अत्यंत महत्त्वाची तीर्थक्षेत्रे मानली जातात. येथे दरवर्षी महाराष्ट्राच्या विविध भागांतून तसेच देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे भाविकांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी तसेच मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. रणाईचे येथील प.पू. प.म. वर्धनस्थ बिडकर बाबा महानुभाव तसेच भरवस येथील प.पू. ढोकिकर बाबा यांनी मंदिर परिसरातील विकासकामांसाठी निधीची मागणी केली होती.

याशिवाय अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुळाचार्य श्री कारंजेकर बाबा आणि प्रकाशशेठ नन्नावरे यांनी देखील महाराष्ट्रातील महानुभाव पंथाच्या विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती. या मागण्यांची दखल घेत राज्य शासनाने रणाईचे आणि भरवस येथील तीर्थक्षेत्रांसाठी निधी मंजूर केला असून त्यामुळे या दोन्ही ठिकाणांचा सर्वांगीण विकास होऊन परिसराचा कायापालट होणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.

या निधीतून मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा मजबूत होणार असून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. पर्यटनाच्या दृष्टीनेही या ठिकाणांचा विकास होणार असल्यामुळे भविष्यात भाविकांची संख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धार्मिक पर्यटनाला चालना मिळाल्यास स्थानिक नागरिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या निधीच्या मंजुरीबद्दल आमदार अनिल पाटील आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.


Protected Content

Play sound