जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या 2025-2026 सार्वत्रिक निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवर आता वादाची छाया पडली आहे. निवडून आलेल्या काही नगरसेवकांच्या नामनिर्देशन अर्जांमध्ये त्रुटी असल्याचा आरोप करत प्रजाशक्ती क्रांती दलाने स्वीकृत नगरसेवक पदाची निवड प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे.
प्रजाशक्ती क्रांती दलाचे राज्य सचिव अॅड. सतीश मोरे यांनी दिलेल्या निवेदनात जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या काही उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांमध्ये तसेच त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची व कागदपत्रांची सखोल फेरतपासणी करण्यात यावी आणि दोषी आढळणाऱ्या उमेदवारांची नगरसेवक पदावरील निवड रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नगरसेवक म्हणून निवडून आलेले कविता सागर पाटील (प्रभाग 8-अ), भागचंद्र मोतीलाल जैन (प्रभाग 8-क), वैशाली अमित पाटील (प्रभाग 13-क), नलूबाई तुळशीदास सोनवणे (प्रभाग 18-ब), सुनील सुपडू महाजन (प्रभाग 14-अ) आणि जयश्री सुनील महाजन (प्रभाग 14-ब) यांच्या नामनिर्देशन अर्जांसोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा करण्यात आला आहे. या बाबींची चौकशी करून सत्यस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय इतर काही नगरसेवकांच्या नामनिर्देशन अर्जांमध्येही त्रुटी असल्याचे पुढील तपासात स्पष्ट झाल्यास त्याबाबत पुरावे प्रशासनासमोर सादर करण्यात येतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी होईपर्यंत जळगाव महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाची निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी प्रजाशक्ती क्रांती दलाने केली आहे.



