Home Cities जळगाव शेतीला चालना देणारा उपक्रम ; शेतकऱ्यांना ड्रोन व स्लरी फिल्टरचे वाटप

शेतीला चालना देणारा उपक्रम ; शेतकऱ्यांना ड्रोन व स्लरी फिल्टरचे वाटप


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा आणि शेती अधिक उत्पादनक्षम तसेच किफायतशीर व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद जळगावच्या कृषी विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती उपकरणे उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये ड्रोन स्लरी फिल्टर यांचे वाटप करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून शेती अधिक प्रगत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पारंपरिक पद्धतींसोबत आधुनिक साधनांचा वापर वाढवून शेतीतील उत्पादन वाढविणे आणि खर्च कमी करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी मिळत आहे. शेतीमध्ये औषध फवारणी अधिक अचूक, जलद आणि कमी खर्चात करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे वेळ आणि मजुरीची बचत होऊन पिकांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येते. त्याचबरोबर सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी स्लरी फिल्टर या उपकरणाचाही वापर महत्त्वाचा ठरत आहे.

जिल्हा परिषद जळगावने या उपक्रमासाठी आपल्या सेस निधीतून मोठी आर्थिक तरतूद केली आहे. ड्रोन खरेदीसाठी सुमारे ५५ लाख रुपये तर स्लरी फिल्टरसाठी १४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक उपकरणांचा लाभ मिळत आहे.

या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ड्रोन तर ८७ शेतकऱ्यांना स्लरी फिल्टरचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा थेट लाभ मिळत असून उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होत आहे. तसेच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळून पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करण्यासही चालना मिळत आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन शेती अधिक प्रगत शाश्वत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. आधुनिक उपकरणांचा वापर वाढल्यास शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound