Home प्रशासन तहसील २० मार्चपर्यंत UDID-आधार लिंक अनिवार्य ; अन्यथा दिव्यांगांचे मासिक अनुदान बंद होण्याची...

२० मार्चपर्यंत UDID-आधार लिंक अनिवार्य ; अन्यथा दिव्यांगांचे मासिक अनुदान बंद होण्याची शक्यता


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शासनाने दरमहा ₹२५०० आर्थिक सहाय्य सुरू केले आहे. मात्र या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक लाभार्थ्यांनी अद्याप आपले वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (UDID कार्ड) आणि दिव्यांग प्रमाणपत्र आधारकार्डशी संलग्न करून तहसील कार्यालयात सादर केलेले नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना ही प्रक्रिया २० मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र दिव्यांग व्यक्तींनी आपल्या जवळच्या महा ई-सेवा केंद्रात जाऊन UDID कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र आधारकार्डशी जोडून घ्यावे. या प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांची माहिती शासनाच्या नोंदीमध्ये अद्ययावत राहणार असून अनुदान वितरण सुलभ होणार आहे.

तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, अद्ययावत आधारकार्ड आणि बँक पासबुक यांची प्रत आपल्या गावातील तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) किंवा तहसील कार्यालयात स्वतः किंवा आपल्या नातेवाईक अथवा मित्रामार्फत २० मार्च २०२६ पर्यंत जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे दिव्यांग अनुदानासंबंधीची माहिती अधिकृतपणे अद्ययावत करण्यात येणार आहे.

प्रशासनाने विशेष सूचनाही जारी केली आहे. दिलेल्या मुदतीत UDID कार्डची माहिती सादर केल्यास किंवा केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण केल्यास शासन निर्णयानुसार संबंधित लाभार्थ्यांचे मासिक आर्थिक सहाय्य बंद होऊ शकते. त्यामुळे लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय भविष्यात तपासणीदरम्यान बनावट किंवा बोगस प्रमाणपत्र आढळल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या कलम ९१ अंतर्गत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच घेतलेल्या लाभाची वसुली देखील केली जाईल, अशी सूचना नायब तहसीलदार, संजय गांधी योजना पारोळा यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound