अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चिकन दुकानाच्या जागेच्या वादातून अमळनेर तालुक्यातील पिळोदे गावात दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास पिळोदे ग्रामपंचायत चौकातील सार्वजनिक ठिकाणी घडली.
याबाबत अधिक असे की, लतीफ इमाम खाटीक (५३, रा. पिळोदे) हे नेहमीप्रमाणे बुधवारी ११ मार्च रोजी रात्री आपले चिकनचे दुकान बंद करत होते. याच वेळी समदशहा दगाशहा फकीर हा त्या ठिकाणी आला. त्याने “ही जागा माझी आहे” असे म्हणत वादाला सुरुवात केली. वादाचे रूपांतर लवकरच शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. समदशहा याने दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून लतीफ खाटीक यांचे नुकसान केले.

लतीफ यांनी विरोध केला असता, समदशहाच्या मदतीला त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य धावून आले. यामध्ये रज्जाकशहा फकीर, जाकीर फकीर, दगाशहा कादरशहा फकीर आणि सलिम फकीर यांचा समावेश होता. या सर्वांनी लतीफ यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. वडिलांना वाचवण्यासाठी गेलेला मुलगा शहा नवाज लतीफ खाटीक यालाही संशयित आरोपींनी मारहाण केली. “पुन्हा येथे दुकान लावले तर तुला जिवंत मारून टाकू,” अशी धमकीही यावेळी देण्यात आली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



