Home प्रशासन भुसावळात गॅस वितरकांची बैठक ; काळाबाजार केल्यास होणार कडक कारवाई

भुसावळात गॅस वितरकांची बैठक ; काळाबाजार केल्यास होणार कडक कारवाई


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गॅस पुरवठा सुरळीत राहावा आणि सामान्य नागरिकांची लूट थांबावी, यासाठी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय अधिकारी केदारे यांच्या आदेशान्वये, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांनी शहरातील गॅस वितरकांची तातडीची बैठक घेतली.

या बैठकीत राहुल वाघ यांनी सर्व वितरकांना स्पष्ट शब्दांत ताकीद दिली की, गॅसचा काळाबाजार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. जर एखादा वितरक अवैध साठवणूक किंवा काळाबाजार करताना आढळला, तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. केंद्र व राज्य शासनाने गॅस वितरणाबाबत जी नियमावली घालून दिली आहे, तिचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सामान्य नागरिक गॅसपासून वंचित राहू नयेत, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. भुसावळ शहरात एकूण सहा गॅस एजन्सी असून सध्या कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. गॅस पुरवठा पारदर्शक पद्धतीने व्हावा, हाच या बैठकीचा मुख्य उद्देश होता.


Protected Content

Play sound