Home प्रशासन तहसील  ‘समाधान शिबिरां’त लाभार्थ्यांच्या शासकीय अडचणी तात्काळ मार्गी – तहसीलदार संजय तायडे

 ‘समाधान शिबिरां’त लाभार्थ्यांच्या शासकीय अडचणी तात्काळ मार्गी – तहसीलदार संजय तायडे


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात शासनाच्या विविध सेवा थेट गावपातळीवर पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या ‘समाधान शिबिरां’ना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांच्या शासकीय कामांशी संबंधित अडचणी तात्काळ सोडविल्या जात असल्याने ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमाला आमदार अमोलभाऊ जावळे यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याची भावना तहसीलदार संजय तायडे यांनी व्यक्त केली.

मोजे खिरोदा (प्र. यावल) महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान (टप्पा-१) अंतर्गत ‘समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात महसूल, कृषी, भूमिअभिलेख तसेच इतर शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांना विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. शिबिरात गावपातळीवरच विविध शासकीय दाखले मंजूर करून ते लाभार्थ्यांना तत्काळ वितरित करण्यात आले.

या शिबिरास खिरोदा प्र. यावल मंडळातील एकूण ११ गावांमधून ४३५ लाभार्थ्यांनी उपस्थिती नोंदवली. शिबिराच्या माध्यमातून विविध विभागांच्या सेवा प्रमाणपत्रे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे नागरिकांना तालुका किंवा जिल्हा कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासली नाही. शासनाच्या सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

शिबिराच्या वेळी जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, उपविभागीय अधिकारी फैजपूर बबन काकडे, तहसीलदार संजय तायडे, नायब तहसीलदार आर. डी. पाटील, गणेश साळी, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, भूमिअभिलेख शाखेचे उपअधीक्षक रऊफ तडवी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये भारत बोंडे (सरपंच कुंभारखेडा), जाबरा तडवी (उपसभापती जि.प.), नयना चौधरी (उपसरपंच), पुष्कर फेगडे (सरपंच रोझोदा), अलका बाळू महाजन (सरपंच वाघोदा बु.), राहुल चौधरी (ग्राम सदस्य खिरोदा प्र. यावल), जुम्मा तडवी (ग्राम सदस्य) यांचीही उपस्थिती होती.


Protected Content

Play sound