Home आंतरराष्ट्रीय स्ट्रेट ऑफ होर्मुझवर तणाव कायम ; भारतीय जहाजांना इराणकडून एका अटीवर परवानगी

स्ट्रेट ऑफ होर्मुझवर तणाव कायम ; भारतीय जहाजांना इराणकडून एका अटीवर परवानगी


तेहरान-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ या सागरी मार्गाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. भारतीय जहाजांना या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवासाची मुभा देण्यात आल्याच्या बातम्या इराणने फेटाळून लावल्या आहेत. रॉयटर्सने इराणी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारताचा झेंडा असलेल्या तेल टँकरना अद्याप अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही.

अलीकडे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात झालेल्या चर्चेनंतर भारताच्या तेल टँकरना स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू वाहतुकीसाठी हा मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने या बातमीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र इराणने स्पष्टपणे सांगितले की, अशा प्रकारची कोणतीही सर्वसाधारण परवानगी दिलेली नाही.

इराणने सध्या केवळ चीनच्या तीन तेल टँकरना या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची मुभा दिल्याची माहिती समोर आली आहे. इराण चीनला तेल विक्री करून आर्थिक व्यवहार करत असल्याने चीनच्या जहाजांना प्राधान्य दिले जात असल्याचेही सांगितले जात आहे. याशिवाय इराणने इतर देशांसमोर एक अट ठेवली असून, ज्या देशांनी इस्रायलच्या राजदूताला बाहेर काढले असेल त्यांनाच स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून प्रवासाची परवानगी दिली जाईल, असे संकेत दिले आहेत.

दरम्यान, इराणच्या या भूमिकेबाबत भारत सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. यापूर्वी भारतीय सूत्रांनी ‘पुष्पक’ आणि ‘परिमल’ या भारतीय टँकरना या मार्गातून सुरक्षित प्रवास करता येत असल्याचा दावा केला होता. मात्र अमेरिका, युरोप आणि इस्रायलशी संबंधित जहाजांना या महत्त्वाच्या सागरी मार्गावर निर्बंधांचा सामना करावा लागत असल्याचेही वृत्त आहे.

दरम्यान, सौदी अरेबियाहून कच्चे तेल घेऊन येणारा लायबेरियाचा झेंडा असलेला एक तेल टँकर यशस्वीरित्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ पार करून मुंबईत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या जहाजाचा कॅप्टन भारतीय असल्याचे सांगितले जात आहे. ‘शेनलॉन्ग स्वेजमॅक्स’ नावाच्या या टँकरने मार्च रोजी सौदी अरेबियातील रास तनुरा बंदरातून कच्चे तेल लोड केले होते आणि मार्च रोजी भारताकडे रवाना झाले होते.

मार्च रोजी या जहाजाचे शेवटचे लोकेशन स्ट्रेट ऑफ होर्मुझ परिसरात दिसले होते. त्यानंतर जहाज अचानक रडारवरून गायब झाले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, या संवेदनशील क्षेत्रातून सुरक्षित प्रवास करण्यासाठी जहाजाने आपली ट्रान्सपोंडर आणि एआयएस ट्रॅकिंग प्रणाली तात्पुरती बंद ठेवली होती. गनिमी काव्याचा वापर करत हे जहाज मार्च रोजी पुन्हा ट्रॅकिंग डेटाबेसवर दिसले आणि अखेर ११ मार्च रोजी सुरक्षितपणे मुंबई बंदरात पोहोचले.

तथापि, काही भारतीय जहाजे अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मुझ परिसरात किंवा त्याच्या आसपास अडकलेली असल्याचे सांगितले जात आहे. या भागात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यावेळी किमान २८ जहाजे या मार्गावर कार्यरत होती. त्यापैकी भारतीय जहाजे लढाई सुरू होण्यापूर्वीच स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या पूर्वेकडे होती आणि ती सध्या तुलनेने सुरक्षित पाण्यात प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे.

पश्चिम आशियातील तणाव वाढत असताना जगातील तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला स्ट्रेट ऑफ होर्मुझ पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. या मार्गावरील निर्बंधांचा परिणाम जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर होण्याची शक्यता असल्याने भारतासह अनेक देश परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.


Protected Content

Play sound