जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिरळेपणा तसेच पडलेल्या पापणीच्या उपचारासाठी ३, ४ आणि ५ एप्रिल रोजी मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले असून गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे.
या शिबिरामध्ये तिरळेपणा आणि पडलेल्या पापणीवरील शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात या शस्त्रक्रिया पार पडणार असून यामध्ये रुग्णांची मोफत तपासणी, शस्त्रक्रिया, औषधे तसेच जेवण व राहण्याची व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात सुमारे १०० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

या शिबिरासाठी रुग्णांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून १, २ आणि ३ एप्रिल रोजी नोंदणी केलेल्या रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर पात्र रुग्णांवर ३ ते ५ एप्रिल या कालावधीत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. त्यामुळे डोळ्यांच्या तिरळेपणा आणि पापणीच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांना या शिबिराचा मोठा लाभ मिळणार आहे.
या शस्त्रक्रिया शिबिरासाठी देशातील नामांकित नेत्रतज्ज्ञांची टीम उपस्थित राहणार आहे. पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे प्रमुख नेत्रतज्ज्ञ व अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर, सचिव व प्रमुख सर्जन डॉ. राजेश पवार, ओक्युलोप्लास्टी सर्जन डॉ. रमेश भांगे तसेच प्रमुख भूलतज्ज्ञ डॉ. श्यामकांत कुलकर्णी आणि प्रमुख संयोजक डॉ. वैभव वनारसे या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया होणार आहेत. या टीमला डॉ. सचिन गाडे, डॉ. संजीव राठोड, डॉ. आनंद खडके, डॉ. मनोज भायगुडे, डॉ. ललित शहा, डॉ. प्रवीण जगताप, डॉ. सचिन बगाडे, डॉ. उदय कुरुडकर, डॉ. अनिल वायकुळे, डॉ. राजेंद्र लोहारे, डॉ. नितीन भालेराव, डॉ. रवी देशमुख तसेच भूलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र जाधव आणि डॉ. बंदल यांसारख्या तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य लाभणार आहे.
शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. पाच वर्षांखालील बालरुग्णांच्या पालकांनी आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा आयुष्यमान कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. इतर रुग्णांनीही संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत. अधिक माहितीसाठी डॉ. शुभम भारसाकळे (७०२८३०३४२३) किंवा डॉ. अभिजीत काकड (९१७५८३००७६) यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करता येणार आहे. या शिबिरासाठी ३१ मार्चपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे.
या शिबिराच्या आयोजनासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक व ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. एन. एस. आर्विकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. रेणुका पाटील, डॉ. निखील चौधरी, डॉ. नितू पाटील, डॉ. प्रिती लालसरे पाटील तसेच सहाय्यक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम विशेष परिश्रम घेत आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी केले आहे.



