जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आर. आर. विद्यालयात मुख्याध्यापक पदाच्या नियुक्तीवरून निर्माण झालेला वाद आता तीव्र झाला असून शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या निष्क्रियतेविरोधात साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक नियुक्ती करण्यात यावी व शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी शिक्षकांनी बुधवार, ११ मार्च २०२६ पासून जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे.
जळगाव शहरातील सुमारे १११ वर्षांची परंपरा असलेल्या इस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी, जळगाव संचलित आर. आर. विद्यालयात १३ जून २०२५ रोजी तत्कालीन मुख्याध्यापक यू. बी. जाधव यांचा राजीनामा संस्थेने मंजूर केला. त्यानंतर नियमानुसार शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाची मुख्याध्यापकपदी नियुक्ती होणे अपेक्षित असताना संस्थेने स्वयंअर्थसहाय्यीत विनानुदानीत इंग्रजी माध्यम शाळेचे मुख्याध्यापक योगेश पांडुरंग चौधरी यांची आर. आर. विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी नियुक्ती केल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. या नियुक्तीला शिक्षकांनी बेकायदेशीर ठरवत तीव्र विरोध दर्शविला होता. या संदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा परिषद जळगाव येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयात पाठविण्यात आला होता.

या निर्णयाविरोधात शाळेतील सर्व शिक्षकांनी १७ जून २०२५ रोजी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग तसेच शिक्षणसंचालक पुणे यांच्याकडे अधिकृत आक्षेप नोंदविला. त्यानंतर शिक्षक प्रतिनिधींनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. अखेर २१ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षणाधिकाऱ्यांनी योगेश चौधरी यांच्या मुख्याध्यापक पदाच्या प्रस्तावाला नकार देत संस्थेला सेवाज्येष्ठतेनुसार नवीन प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले.
मात्र, इस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीने शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप शिक्षकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी उपसंचालक कार्यालयात आयोजित शिक्षक दरबारात हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी २१ जानेवारी २०२६ रोजी दूरध्वनीद्वारे शिक्षणाधिकारी जळगाव यांना तातडीने सेवाज्येष्ठ शिक्षकाची प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार १० फेब्रुवारी २०२६ रोजी आर. आर. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एस. आर. पिले यांची प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
शिक्षण विभागाच्या प्रतिनिधी तसेच पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षांच्या उपस्थितीत पिले यांच्याकडे कार्यभार सोपविण्याबाबत संस्थेला व योगेश चौधरी यांना सूचित करण्यात आले होते. मात्र आजपर्यंत त्यांना कार्यभार देण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाळेचे महत्त्वाचे दस्तावेज आणि मुख्याध्यापक कार्यालयाच्या चाव्या अद्यापही योगेश चौधरी यांच्याकडेच असल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यामुळे नियुक्ती झाल्यानंतरही एस. आर. पिले यांना कोणतेही प्रशासकीय कामकाज करता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जून २०२५ पासून शाळेत मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक ही तीन महत्त्वाची पदे रिक्त असल्याने शाळेचे प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले आहे. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असून पालक आणि शिक्षकांनाही मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
शिक्षणाधिकारी हे प्रशासकीय पद असल्याने प्रत्येक शाळेचे दैनंदिन कामकाज सुरळीत राहण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. आर. आर. विद्यालय इतक्या काळ मुख्याध्यापकाविना का आहे, याबाबत संस्थेला जाब विचारून तातडीने निर्णय घेण्यात यावा तसेच आवश्यक असल्यास प्रशासकीय अधिकारांचा वापर करून योग्य कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी साखळी उपोषण करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



