Home क्राईम नागरिकांनो सावधान ! वाहनसेवेवर सुरु आहे फसवणूक; अधिकृत संकेतस्थळाचा करा वापर

नागरिकांनो सावधान ! वाहनसेवेवर सुरु आहे फसवणूक; अधिकृत संकेतस्थळाचा करा वापर


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी तसेच ई-चलन भरण्याच्या नावाखाली खोट्या लिंकद्वारे नागरिकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार वाढत असल्याने परिवहन विभागाने वाहनचालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. केवळ अधिकृत शासकीय संकेतस्थळांवरूनच सेवा घ्याव्यात, अन्य कोणत्याही संशयास्पद लिंकवर माहिती भरू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की काही सायबर गुन्हेगार वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण किंवा ई-चलन भरण्याच्या नावाखाली नागरिकांना बनावट लिंक पाठवत आहेत. या लिंकवर वैयक्तिक माहिती भरल्यानंतर नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहन नोंदणीसाठी VAHAN (https://vahan.parivahan.gov.in), ड्रायव्हिंग लायसन्स सेवांसाठी SARATHI (https://sarathi.parivahan.gov.in), तसेच इतर परिवहन सेवांसाठी https://www.parivahan.gov.in या अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा. ई-चलन भरण्यासाठी https://echallan.parivahan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच व्यवहार करावेत, असे सांगण्यात आले आहे.

ही सर्व अधिकृत संकेतस्थळे gov.in या डोमेनने समाप्त होतात. त्यामुळे .com, .online, .site, .in अशा डोमेन असलेल्या संशयास्पद संकेतस्थळांवर नागरिकांनी कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा बँकिंग माहिती भरू नये. अशा लिंकवर क्लिक केल्यास सायबर फसवणुकीचा धोका वाढू शकतो.

परिवहन विभाग किंवा आरटीओ कार्यालयाकडून WhatsApp द्वारे कोणतीही पेमेंट लिंक पाठविली जात नाही, हेही नागरिकांनी लक्षात ठेवावे. तसेच कोणत्याही संशयास्पद लिंकवरून APK अॅप्स डाउनलोड करू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

जर अशा प्रकारच्या फसवणुकीचा संशय आला किंवा नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली असेल तर तात्काळ www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी किंवा १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जवळच्या जिल्हा सायबर पोलीस ठाण्यातही तक्रार करता येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी कळविले आहे.


Protected Content

Play sound