Home आंतरराष्ट्रीय इराण-अमेरिका संघर्षात नवा ट्विस्ट ; ट्रम्प बॅकफूटवर? युद्धबंदी चर्चेचे संकेत  

इराण-अमेरिका संघर्षात नवा ट्विस्ट ; ट्रम्प बॅकफूटवर? युद्धबंदी चर्चेचे संकेत  


वॉशिंग्टन-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-अमेरिका संघर्षाने आता वेगळे वळण घेतल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. इराणकडून मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाबाबतचा सूर काहीसा मवाळ केल्याचे दिसून येत आहे. युद्धाच्या दहाव्या दिवशी ट्रम्प यांनी युद्धबंदीसाठी चर्चा करण्याची तयारी दर्शवली असून, योग्य अटी पूर्ण झाल्यास इराणसोबत वाटाघाटी शक्य असल्याचे संकेत दिले आहेत.

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले आहे. इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर सातत्याने हल्ले केले जात असताना इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विशेषतः मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांवर इराणने केलेल्या बॉम्बहल्ल्यांनंतर परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी एका मुलाखतीत सांगितले की, इराणचे नेतृत्व चर्चेसाठी इच्छुक असल्याचे संकेत देत आहे आणि त्यांच्याशी संवाद साधण्यास अमेरिका तयार आहे. मात्र, या चर्चेसाठी काही अटी असतील आणि त्यावरच पुढील निर्णय घेतला जाईल.

या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होत आहे. मध्यपूर्व हा तेलाचा महत्त्वाचा स्रोत असल्यामुळे अनेक देशांना संभाव्य तेल संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रशिया, चीन आणि फ्रान्स यांसारख्या प्रमुख देशांनी युद्धविरामासाठी पुढाकार घेतला आहे. या आंतरराष्ट्रीय दबावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडूनही आता काही सकारात्मक संकेत मिळू लागले आहेत. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिका सुरुवातीपासूनच चर्चेसाठी तयार होती; मात्र इराणकडून सातत्याने टाळाटाळ केली जात होती.

ट्रम्प यांच्या या विधानाचे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे महत्त्व मानले जात आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या अहवालानुसार ट्रम्प यांच्या काही सल्लागारांनी त्यांना इराणसोबत वाटाघाटीचा मार्ग शोधण्याचा सल्ला दिला आहे. युद्ध लांबत चालल्यास अमेरिकेलाही आर्थिक आणि लष्करी नुकसान सहन करावे लागू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ‘असोसिएटेड प्रेस’ने एका गुप्तचर अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, इराणमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता सध्या फार कमी आहे, कारण इराणी जनता त्यासाठी तयार नाही. त्यामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धाचा फायदा अमेरिकेला होणार नाही, असे विश्लेषण समोर येत आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी मुलाखतीदरम्यान इराणवरील हल्ल्याचे समर्थनही केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्टीव्ह विटकॉफ आणि जेराड कुशनेर हे चर्चा करण्यासाठी इराणशी संपर्कात होते; मात्र इराणकडून वेळकाढूपणा करण्यात येत होता. विटकॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार इराण ११ अण्वस्त्रे तयार करण्याच्या तयारीत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन हल्ला करणे हा योग्य निर्णय असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

याशिवाय, खाडी देशांवर झालेल्या हल्ल्यांबाबतही ट्रम्प यांनी इराणवर टीका केली. ज्या देशांनी इराणवर थेट हल्ला केला नव्हता, अशा काही देशांवरही इराणने बॉम्बहल्ले केल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनांमुळे मध्यपूर्वेतील तणाव अधिक वाढला असून, परिस्थिती कधीही गंभीर वळण घेऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या जगातील अनेक देश या संघर्षावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. युद्ध अधिक तीव्र होण्याऐवजी चर्चेच्या मार्गाने तोडगा निघावा, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय समुदायाकडून व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound