Home Cities जळगाव जळगाव मनपाचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प उद्या स्थायी समितीत होणार सादर

जळगाव मनपाचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प उद्या स्थायी समितीत होणार सादर


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या आगामी आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले असून उद्या मंगळवार, १० मार्च रोजी स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मनपा प्रशासनाकडून सुमारे १४०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. शहरातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरी सेवांसाठी निधीची तरतूद कशी होणार याबाबत या अर्थसंकल्पातून दिशा मिळणार असल्याने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२५-२६ साठी जळगाव महानगरपालिकेचा १२४७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्या अर्थसंकल्पात विशेष म्हणजे कोणतीही करवाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे नागरिकांना आर्थिक दिलासा मिळाला होता आणि मनपा प्रशासनाच्या या निर्णयाचे शहरात स्वागतही झाले होते.

दरम्यान, यंदाचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेत मांडण्यात येणार आहे. आगामी आर्थिक वर्षात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या योजना राबविण्यात येणार आहेत, तसेच पायाभूत सुविधांसाठी किती निधीची तरतूद केली जाणार आहे याबाबत उत्सुकता आहे. विशेषतः रस्ते विकास, पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छता सेवा, सार्वजनिक सुविधा आणि शहरातील विविध नागरी प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थायी समितीच्या या सभेत प्रशासनातर्फे अर्थसंकल्प अधिकृतपणे समितीसमोर मांडण्यात येणार आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर समिती सदस्यांना त्याचा सविस्तर अभ्यास करता यावा यासाठी ही सभा तहकूब करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे.

 

 


Protected Content

Play sound