
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । इराण येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही दिसून येत आहे. जळगाव शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून गेल्या काही दिवसांपासून सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांनी गॅस गोडाऊनकडे मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनेक भागांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच अनेक नागरिकांनी शहरातील विविध गॅस गोडाऊनसमोर रांगा लावल्या. सिलेंडरचा तुटवडा भासू लागल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली असून काही ठिकाणी गोंधळाचे वातावरणही निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
गोडाऊनवर आलेल्या नागरिकांना “पावती घेऊन या, त्यानंतरच सिलेंडर मिळेल,” असे सांगितले जात असल्याने अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही नागरिकांनी आधीच बुकिंग केल्याचा दावा केला असतानाही त्यांना त्वरित सिलेंडर मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गोडाऊन परिसरात दीर्घ रांगा आणि गर्दीचे दृश्य दिवसभर पाहायला मिळाले.
दरम्यान, ऑनलाईन गॅस बुकिंग सेवा सध्या व्यवस्थित सुरू नसल्याची माहितीही समोर येत आहे. अनेक नागरिकांना मोबाईल किंवा ऑनलाईन माध्यमातून गॅस बुकिंग करता येत नसल्याने त्यांना थेट गोडाऊनवर जावे लागत आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा होत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी करत गॅस सिलेंडरचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा आणि घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली आहे. सध्या अनेक कुटुंबांमध्ये स्वयंपाकासाठी गॅस संपत आल्याने घरगुती अडचणी निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, संबंधित प्रशासन आणि गॅस वितरण यंत्रणांनी या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन पुरवठा नियमित करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. योग्य नियोजन करून सिलेंडर वितरण सुरळीत झाले तर नागरिकांची चिंता कमी होईल, असे मतही व्यक्त केले जात आहे.



