
धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील कृष्ण गीता नगर भागात एक मोठी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. महिला ही आपल्या परिवारासह लग्नानिमित्त नाशिक येथे गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी रविवारी ९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, किरण प्रल्हाद विसपुते (वय ४५) या महिला आपल्या कुटुंबासह ७ मार्च रोजी नाशिक येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ७ मार्चच्या रात्री ११ ते ८ मार्चच्या सकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान त्यांच्या कृष्ण गीता नगरमधील घराला लक्ष्य केले. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉकर तोडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली. यात प्रामुख्याने ७ ग्रामची सोन्याची माळ, १० ग्रामची सोन्याची चैन, ३० ग्रामचा सोन्याचा राणी हार, १० ग्रामचा सोन्याचा नेकलेस, सोन्याचे झुमके, आणि सोन्याची ठुशी यांचा समावेश आहे. दागिन्यांसोबतच कपाटात ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड देखील चोरट्यांनी लंपास केला आहे.
८ मार्च रोजी सकाळी विसपुते कुटुंब घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ धरणगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



