Home आरोग्य रावेर तालुक्यात मोफत नेत्रतपासणी शिबिरे; ११ मार्चपासून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाचा उपक्रम

रावेर तालुक्यात मोफत नेत्रतपासणी शिबिरे; ११ मार्चपासून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाचा उपक्रम


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  रावेर तालुक्यातील नागरिकांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे ११ मार्चपासून व्यापक नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात हे शिबीर होणार असून तज्ज्ञ नेत्रतज्ज्ञांकडून रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. गरज भासल्यास रुग्णांवर रुग्णालयात मोफत शस्त्रक्रियाही करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे सामाजिक दायित्वाच्या भावनेतून विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करत असते. आरोग्य सेवेचा ध्यास घेतलेल्या या संस्थेमार्फत आतापर्यंत हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना दिलासा देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर रावेर तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याच्या उद्देशाने या नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील प्रख्यात नेत्रतज्ज्ञ रुग्णांची तपासणी करणार आहेत. तपासणीनंतर ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल त्यांना जळगाव येथील रुग्णालयात नेऊन मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या शिबिरांचा प्रारंभ ११ मार्च रोजी रावेर तालुक्यातील लहान वाघोदे येथून होणार असून त्याच दिवशी थोरगव्हाण, चुनवाडे आणि मांगी येथे शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. त्यानंतर तालुक्यातील विविध गावांमध्ये टप्प्याटप्प्याने नेत्रतपासणी शिबिरे घेण्यात येणार आहेत. १३ मार्च रोजी सूदगाव, रायपूर, गहुखेडे, कठोरे येथे, १६ मार्च रोजी रणगाव, तासखेडे, उदळी खुर्द व उदळी बुद्रुक येथे शिबिरे होणार आहेत.

१८ मार्च रोजी गाते, लूमखेडा, मंगलवाडी, तांदलवाडी, २० मार्च रोजी मस्कावद, दसनूर, आंदलवाडी, सुनोदा, तर २३ मार्च रोजी सिगत, बलवाडी पुरी आणि गोलवाडे येथे शिबिरे होणार आहेत. पुढे २५ मार्च रोजी निंभोरा, खिर्डी बुद्रुक, खिर्डी खुर्द, भामलवाडी तसेच २७ मार्च रोजी अजंदे, रेंभोटा, वाघाडी आणि शिंगाडी येथे नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.

यानंतर ३० मार्च रोजी धामोडी, कांडवेल, कोळदा, सुलवाडी, ६ एप्रिल रोजी निंबोल, विटवा, सांगवे, नांदुरखेडा, ८ एप्रिल रोजी पुणखेडे, पातोंडी, बोहर्डे आणि निंभोरा सिम येथे शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. १० एप्रिल रोजी खिरवळ, थेरोडे, धुरखेडे, नेहते, तर १५ एप्रिल रोजी तामसवाडी, मोरगाव बुद्रुक, मोरगाव खुर्द आणि दोधे येथे शिबिरे होणार आहेत.

१७ एप्रिल रोजी वाघोड, अटवाडे, अजनाड, चोरवड, २० एप्रिल रोजी खानापूर, नेरूळ, पाडळे बुद्रुक, पाडळे खुर्द, २२ एप्रिल रोजी कर्जद, अहिरवाडी, मोहगण, पिंपरी, तर २४ एप्रिल रोजी बोरखेडे, भोकरी, केर्‍हाळे बुद्रुक, केर्‍हाळे खुर्द आणि जुनोने येथे नेत्रतपासणी केली जाणार आहे.

तसेच २७ एप्रिल रोजी रसलपूर, बक्षीपूर, रमजीपूर, खिरोदा (प्र. रावेर), २९ एप्रिल रोजी अभोळे बुद्रुक, अभोळे खुर्द, जीन्सी, मोरव्हाल आणि गुलाबवाडी येथे शिबिरे होणार आहेत. पुढे ४ मे रोजी शिंदखेडा, मुंजलवाडी, कुसुंबा, लालमाती, सहस्त्रलिंग, ६ मे रोजी भातखेडा, ऊटखेडा, गौरखेडा, लोहारा, ८ मे रोजी मोठा वाघोदा, वडगाव, विवरा आणि भोर (रावेर स्टेशन) येथे शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

११ मे रोजी कोचूर, चिनावल, कुंभारखेडा, सावखेडा, १३ मे रोजी रोझोदा, खिरोदा, कळमोदा, जानोरी, १५ मे रोजी पाल, गारखेडे, निमड्या, अंधारमळी आणि १८ मे रोजी तिड्या, मोहमांडली व गारबर्डी येथे या शिबिरांची सांगता होणार आहे.

रावेर तालुक्यातील नागरिकांनी या मोफत नेत्रतपासणी शिबिरांचा लाभ घेऊन आपल्या डोळ्यांची तपासणी करून घ्यावी आणि गरज असल्यास उपचार करून घ्यावेत, असे आवाहन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने केले आहे.


Protected Content

Play sound