Home उद्योग पुण्यात पेट्रोलसाठी आगाऊ पैसे अनिवार्य? आखातातील युद्धामुळे इंधनपुरवठ्यावर परिणाम 

पुण्यात पेट्रोलसाठी आगाऊ पैसे अनिवार्य? आखातातील युद्धामुळे इंधनपुरवठ्यावर परिणाम 


पुणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । आखातातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले असून पुण्यात इंधनपुरवठ्याबाबत चिंताजनक स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील संघर्षामुळे जागतिक पातळीवर इंधनपुरवठ्यावर परिणाम होत असताना तेल कंपन्यांनी पुण्यातील पेट्रोल पंप चालकांना इंधनासाठी आगाऊ पैसे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे शहरातील जवळपास ५० टक्के पेट्रोल पंप बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मध्यपूर्वेतील तणावामुळे आधीच जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांमध्ये दिसू लागला आहे. पुणे शहरातही युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या असून आता पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेबाबतही चिंता वाढू लागली आहे. विविध पेट्रोलियम कंपन्यांनी पुण्यातील डीलर्सना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, इंधनाच्या टँकरमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्यापूर्वी त्याचे संपूर्ण पैसे आगाऊ जमा करणे आवश्यक राहील.

या निर्णयामुळे पेट्रोल पंप चालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. कारण आतापर्यंत तेल कंपन्या डीलर्सना काही दिवसांची क्रेडिट सुविधा देत होत्या. मात्र आता ही सुविधा अचानक बंद करण्यात आली आहे. परिणामी अनेक पेट्रोल पंप मालकांना मोठी आर्थिक अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऑल इंडिया पेट्रोल डिझेल असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, युद्धजन्य परिस्थितीमुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांना आगाऊ रक्कम जमा करण्याची अट घातली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या प्रमुख कंपन्यांनी पेट्रोल पंप मालकांना स्पष्ट केले आहे की, आगाऊ पैसे भरल्याशिवाय टँकरमध्ये इंधन भरण्यात येणार नाही. मात्र अनेक पंप चालकांची आर्थिक परिस्थिती अशी नाही की ते मोठ्या प्रमाणावर आगाऊ पैसे देऊ शकतील.

पुणे शहरात सुमारे ५५० पेट्रोल पंप कार्यरत आहेत. त्यापैकी जवळपास निम्मे पेट्रोल पंप या नव्या नियमामुळे बंद पडण्याची शक्यता असल्याचे पंप चालकांचे म्हणणे आहे. सध्या देशात इंधनाचा साठा उपलब्ध असतानाही अचानक अशा प्रकारे आगाऊ पैसे मागण्याचा निर्णय घेणे योग्य नसल्याची टीका डीलर्सकडून केली जात आहे. याबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही पेट्रोल पंप संघटनांकडून करण्यात आली आहे.

यापूर्वी तेल कंपन्या पेट्रोल पंप चालकांना सात ते आठ दिवसांची क्रेडिट लाइन देत होत्या. त्यामुळे पंप चालकांना इंधन विक्रीनंतर पैसे जमा करण्याची मुभा मिळत होती. मात्र आता ही क्रेडिट सुविधा पूर्णपणे बंद करण्यात आली असून पैसे भरल्याशिवाय पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही, असा स्पष्ट संदेश कंपन्यांकडून देण्यात आला आहे. यामुळे अनेक पंप चालक अडचणीत सापडले असून इंधनपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वाढली आहे.

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवर जाणवू लागल्याने पुणेकरांमध्येही चिंता वाढली आहे. पेट्रोल पंप बंद पडल्यास शहरात इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound