Home Cities जळगाव शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा अर्थसंकल्प – डॉ. उल्हास पाटील

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा अर्थसंकल्प – डॉ. उल्हास पाटील


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  राज्याचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर केला असून या अर्थसंकल्पात शेतकरी आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

शेती अधिक फायदेशीर व्हावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाने ‘महाविस्तार’ या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील सुमारे 30 लाख शेतकऱ्यांना शेतीविषयक तांत्रिक मार्गदर्शन, हवामान अंदाज, पिक व्यवस्थापन तसेच बाजारपेठेतील दरांची माहिती त्वरित उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेणे सोपे होणार असून उत्पादनवाढीसही मदत होणार आहे.

याशिवाय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचाही समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतल्याचेही डॉ. उल्हास पाटील यांनी नमूद केले. यामुळे शेती क्षेत्रात काम करणाऱ्या शेतमजुरांनाही संरक्षण मिळणार असून ग्रामीण भागातील मोठ्या वर्गाला या योजनेचा लाभ मिळेल. शेतीसह ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याच्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सरकारने केला असून हा अर्थसंकल्प शेतकरी आणि ग्रामीण समाजाला बळ देणारा असल्याचे मत डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले.

 


Protected Content

Play sound