Home क्राईम होळीला कुटुंब गावी, चोरट्यांचा डाव साधला; शिक्षक कॉलनीत मोठी घरफोडी

होळीला कुटुंब गावी, चोरट्यांचा डाव साधला; शिक्षक कॉलनीत मोठी घरफोडी


जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या शिक्षक कॉलनीत घरफोडीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. होळीच्या सणानिमित्त कुटुंबासह गावी गेलेल्या घरमालकाच्या अनुपस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे १ लाख ६८ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या घटनेतील संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

जामनेर शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात राहणारे दरबार नवलसिंग राठोड हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. होळी सणाच्या निमित्ताने ते आपल्या परिवारासह गावी गेले होते. घर बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी संधी साधत दिनांक ७ रोजी पहाटे सुमारे पाच वाजेच्या सुमारास घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटे व इतर सामानाची झडती घेत सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. प्राथमिक माहितीनुसार सुमारे १ लाख ६८ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले आहेत. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले असून त्याच्या आधारे पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर शिक्षक कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्येही सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणी घरमालक दरबार राठोड यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून लवकरच आरोपींचा माग काढला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound