
पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील कजगाव नाका परिसरात दीर्घकाळापासून वाढत चाललेल्या अनधिकृत अतिक्रमणावर अखेर नगरपालिकेने कारवाई करत मोठी अतिक्रमण मोहीम राबवली. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार आणि संविधान स्मारकाच्या शेजारील अतिक्रमण हटविण्यात आल्यामुळे परिसर मोकळा झाला असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

पारोळा शहरातील कजगाव नाका हा अत्यंत गजबजलेला आणि वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराच्या आसपास अनेक अनधिकृत अतिक्रमणे उभी राहिल्यामुळे रस्ते अरुंद झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना तसेच परिसरातील कॉलनी भागात राहणाऱ्या रहिवाशांना वाहतुकीदरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा वाहनचालकांना तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत होती.
या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सकाळी विशेष मोहीम राबवत नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार व संविधान स्मारक शेजारील अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील रस्ते मोकळे झाले असून वाहतुकीला दिलासा मिळाला आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर परिसरातील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाचे, नगराध्यक्ष तसेच नगरसेवक-नगरसेविकांचे आभार व्यक्त केले.
नागरिकांनी यावेळी शहरातील इतर भागांमध्येही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याचे लक्ष वेधले. विशेषतः पारोळा शहरातील मुख्य नगरपालिका परिसरातील महाराणा प्रताप चौक येथेही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच शिवतीर्थ परिसरातील राणी लक्ष्मीबाई प्रवेशद्वाराच्या आसपासही अनेक अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याने नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने शहरातील इतर ठिकाणांवरील अतिक्रमणावरही तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून जोर धरत आहे. अतिक्रमणमुक्त शहरासाठी सातत्याने अशा मोहिमा राबविण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.



