
यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी फाट्याजवळ झालेल्या दुचाकी अपघातात लोहाराच्या ३५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रस्त्यात अचानक कुत्रा आल्याने वाहनाचा ताबा सुटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुल्फिकार ईसा तडवी (वय ३५, रा. लोहारा, ता. रावेर, जि. जळगाव) हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच-१९ डीजी-९५२३ वरून यावल येथून मोहना या दिशेने जात होते. बुधवारी (४ मार्च) रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास साकळी फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यांचा गंभीर अपघात झाला.
या अपघातात जुल्फिकार तडवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, यावल येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती साजीद हमिद तडवी (वय २२, व्यवसाय – फोटोग्राफर, रा. मोहना, ता. चोपडा) यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर यावल पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक १४/२०२६ नुसार भा.न्या.सं. कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून पुढील तपास यावल पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सोनवणे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्त्यावर मोकाट जनावरांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे.
या दुर्दैवी अपघातात एका तरुणाचा जीव गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.



