Home राजकीय ज्येष्ठांना डावलून ज्योती वाघमारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ज्येष्ठांना डावलून ज्योती वाघमारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल


मुंबई- वृत्तसेवा । महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे अंदाज चुकवत मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला तांत्रिकदृष्ट्या राज्यसभेची एकच जागा येत असताना पक्षाने ज्येष्ठ नेत्यांऐवजी सोलापूरच्या आक्रमक प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगवली आहे. ज्योती वाघमारे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत उमेदवारीबाबत चर्चा सुरू असताना भाजपकडून चार उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडूनही उमेदवारांची नावे समोर येऊ लागली आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून सुरुवातीला माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र ऐनवेळी त्यांच्या नावाला मागे टाकत ज्योती वाघमारे यांना संधी देण्यात आल्याने हा निर्णय ‘धक्कातंत्र’ म्हणून पाहिला जात आहे.

शिवसेना शिंदे गटाची स्थापना झाल्यापासून ज्योती वाघमारे यांनी पक्षाची भूमिका ठामपणे आणि आक्रमकपणे मांडण्याचे काम केले आहे. विविध राजकीय मुद्द्यांवर माध्यमांमध्ये पक्षाची बाजू मांडताना त्यांनी प्रभावी उपस्थिती दाखवली आहे. विशेषतः ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्याकडून होणाऱ्या टीकेला त्यांनी सातत्याने सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांच्या आक्रमक आणि अभ्यासू वक्तृत्वामुळे त्या शिंदे गटाच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.

ज्योती वाघमारे यांची राजकीय वाटचालही उल्लेखनीय राहिली आहे. फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीतून प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केले. यापूर्वी त्या काँग्रेस पक्षात सक्रिय होत्या आणि शहर महिला अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांच्या प्रचार सभांचे सूत्रसंचालन आणि संयोजनही त्यांनी केले होते. पुढे शिवसेनेत झालेल्या राजकीय घडामोडीनंतर एप्रिल २०२३ मध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.

राजकीय वर्तुळात अशीही चर्चा सुरू आहे की, सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात मजबूत वैचारिक आणि राजकीय आव्हान उभे करण्याच्या दृष्टीनेही ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची संधी दिली जात आहे. राज्यसभेची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या चर्चांना अधिक स्पष्टता मिळणार असली तरी शिंदे गटाकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

प्रा. डॉ. ज्योती वाघमारे या सोलापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेला सक्रिय चेहरा मानला जातो. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. अत्यंत साध्या परिस्थितीतून त्यांनी सामाजिक कार्याची वाट निवडली. नागनाथ वाघमारे यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हॉटेलमध्ये वेटर तसेच बांधकाम मजूर म्हणूनही काम केले होते. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत नागरिकांनी त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले होते.

ज्योती वाघमारे यांनी सुरुवातीच्या काळात मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि आंबेडकरी चळवळीतून सामाजिक कार्याची सुरुवात केली. काही काळ त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले. पुढे उच्च शिक्षणाचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी व्हावा या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित व्याख्याने दिली. वालचंद महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापिका म्हणूनही काही काळ काम केले आहे.

शैक्षणिकदृष्ट्याही ज्योती वाघमारे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इंग्रजी साहित्यात त्यांनी पीएचडी केली असून दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवले होते. बारावीच्या परीक्षेत पुणे विभागात मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये त्या प्रथम आल्या होत्या. अर्धमागधी विषयात राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान त्यांना मिळाला आहे. महिलांच्या प्रश्नांवरील संशोधनासाठी त्यांना राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारही प्राप्त झाला आहे. सुमारे दहा वर्षांहून अधिक काळ प्राध्यापिका म्हणून काम करण्याचा त्यांना अनुभव आहे.

मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड अशा पाच भाषांवर प्रभुत्व असलेल्या ज्योती वाघमारे यांनी मागील १५ वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय काम केले आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख अशी जबाबदारी सोपवण्यात आली. विविध मंचांवर आणि चर्चासत्रांमध्ये त्यांनी शिवसेनेची बाजू ठामपणे मांडत पक्षात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सलग तीन दसरा मेळाव्यांमध्ये त्यांनी केलेल्या घणाघाती भाषणांमुळे त्यांची ओळख अभ्यासू आणि आक्रमक वक्त्या म्हणून निर्माण झाली आहे. विरोधकांवर तीव्र टीका करताना त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि राज्याच्या राजकारणावर सखोल भाष्य केले आहे. त्यामुळे जनतेत लोकप्रिय ठरत असलेला हा चेहरा राज्यसभेत पोहोचल्यास सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या विस्ताराला चालना मिळू शकते, असेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.


Protected Content

Play sound