
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील अयोध्यानगर परिसरात केमिकलयुक्त सांडपाणी नाल्यात सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आला असून त्यामुळे परिसरातील हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. मध्यरात्रीनंतर नाल्यातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांना डोळे व घशात जळजळ, मळमळ तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांकडून केमिकलयुक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट अयोध्यानगर परिसरातील नाल्यात सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रात्री उशिरा हे सांडपाणी सोडले जात असल्याने मध्यरात्रीनंतर नाल्यातून प्रचंड उग्र दुर्गंधी पसरते. त्यामुळे अयोध्यानगर, हनुमान नगर, यमुनानगर, सद्गुरूनगर, कौतिकनगर, लक्ष्मीनारायणनगर आणि श्रीनगर या परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नाल्यातून येणाऱ्या या तीव्र वासामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवत आहेत. काही नागरिकांना डोळ्यांत तीव्र जळजळ, घशात खवखव आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात आले आहे. एका अडीच वर्षांच्या बालकाला श्वसनाचा गंभीर त्रास झाल्याची माहितीही स्थानिकांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या केमिकलयुक्त सांडपाण्याचा परिणाम घरातील वस्तूंवरही होत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. अनेक घरांमधील तांबे व स्टीलची भांडी तसेच चांदीच्या मूर्ती, पैंजण, अंगठ्या आणि सोन्याचे दागिने काळे, लाल किंवा निळसर पडत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. काही घरांचे लोखंडी दरवाजेही काळवंडू लागल्याचे नागरिकांनी सांगितले. या घटनेमुळे सांडपाण्यातील रासायनिक घटकांची तीव्रता किती धोकादायक असू शकते याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
सदर नाला सुमारे दोन किलोमीटर परिसरातून वाहत असल्याने अंदाजे दोन ते तीन हजार घरांना या समस्येचा फटका बसत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रात्री सुमारे ११ वाजल्यापासून ते पहाटे २.३० वाजेपर्यंत या नाल्यात केमिकलयुक्त पाणी सोडले जाते आणि त्यानंतर परिसरात दुर्गंधी अधिक वाढते. त्यामुळे रात्री नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या संदर्भात लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने परिसरातील नागरिकांशी संवाद साधला असता अनिल मेश्राम, प्रांजल कोळी व सुप्रिया मेश्राम आपल्या व्यथा मांडल्या. आरोग्य आणि पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.



