मुंबई- वृत्तसेवा । दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. अपघाताच्या घटनाक्रमापासून ते चौकशी करणाऱ्या संस्थांच्या भूमिकेपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी संशय व्यक्त केला असून हा अपघात नसून घातपात असू शकतो, असा ठाम आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात आज घेतलेल्या चौथ्या पत्रकार परिषदेत त्यांनी नवे स्फोटक दावे करत राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण केला.
रोहित पवार यांनी सांगितले की, अपघातानंतर महिनाभर उलटूनही चौकशी यंत्रणांकडून ठोस माहिती समोर आलेली नाही. कुणाच्या तरी दबावाखाली संपूर्ण प्रकरण दडपले जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. अजितदादांच्या मृत्यूमागे नियोजित कट असू शकतो, अशी शक्यता त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.

या पत्रकार परिषदेत त्यांनी VSR कंपनीच्या कारभारावर घणाघाती टीका केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला देखील याच कंपनीमुळे धोका निर्माण झाला होता, असा गंभीर दावा त्यांनी केला. कोणत्याही आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी संबंधित देशांची ओव्हरफ्लाईट परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र १६ ते २० जानेवारी २०२३ दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर जात असताना आवश्यक परवानग्या न घेता विमान इराण आणि इराकच्या हवाई क्षेत्रात प्रवेशल्याचे त्यांनी म्हटले.
रोहित पवारांच्या दाव्यानुसार, इराणकडून फायटर जेट पाठवत विमान पाडण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर इराकनेही अशाच प्रकारचा इशारा दिला. परिस्थिती गंभीर झाल्याने विमानाचा मार्ग बदलून ते पुन्हा बहरीन येथे आणावे लागले आणि सर्व परवानग्या घेतल्यानंतरच पुढील उड्डाण करण्यात आले. “एकनाथ शिंदेंच्या बाबतीतही तोच प्रकार घडणार होता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या घटनेची माहिती नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) सार्वजनिक केली का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
VSR कंपनीचा बेजबाबदारपणा यापूर्वीच उघड झाला असून अजित पवार प्रकरणातही त्याच कंपनीचा सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला. “इतक्या गंभीर चुका करणाऱ्या कंपनीला कोण संरक्षण देत आहे?” असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला.
पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला. VSR कंपनीच्या विमानाचा मालक विजय सिंग यांनी त्यांच्या एका सहकाऱ्याशी संपर्क साधल्याचा दावा त्यांनी केला. “आम्हाला एआयबीने क्लीयरन्स दिले आहे. माझी वरपर्यंत ओळख आहे. अजूनही सरकारमधील लोक आमची विमाने वापरत आहेत,” असे संभाषण झाल्याचे त्यांनी सांगितले. विजय सिंग यांच्या व्हॉट्सअॅप रेकॉर्डची चौकशी करावी, त्यांनी महाराष्ट्र सदनात कोणकोणाला भेट घेतली याची माहिती जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
रोहित पवार यांच्या या स्फोटक आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून सरकारकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार विमान अपघात प्रकरण आणि एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावरील कथित निष्काळजीपणाबाबत सत्य काय, हे आगामी चौकशीतून स्पष्ट होणार का, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे.



