दुबई- वृत्तसेवा । अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तीव्र संघर्षाचा आज (4 मार्च) पाचवा दिवस असून मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच चिघळली आहे. इराणने दुबईतील अमेरिकन दूतावासावर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे, तर अमेरिका आणि इस्रायलने इराण व लेबनॉनमधील लक्ष्यांवर हवाई हल्ल्यांची मालिका कायम ठेवली आहे.
या युद्धाच्या पार्श्वभूमीवर Iran ने अमेरिकेच्या मुस्लीम दोस्त राष्ट्रांवरही मिसाईल आणि ड्रोन मारा सुरूच ठेवला असल्याचा दावा केला आहे. दुबईतील अमेरिकन दूतावासावर झालेल्या हल्ल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीतील सुरक्षाव्यवस्था सतर्क करण्यात आली आहे. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, Israel ने लेबनॉनमध्ये इराण समर्थक संघटना Hezbollah विरुद्ध लष्करी कारवाया तीव्र केल्या आहेत. लेबनॉन प्रशासनाच्या माहितीनुसार, इस्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला असून 335 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दक्षिण लेबनॉनमधील 16 गावे आणि शहरांतील नागरिकांना तातडीने स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत.
हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमधील मेतुला शहरात इस्रायली सैन्यावर रॉकेट हल्ला केल्याचा दावा केला आहे. यापूर्वी त्यांनी हैफा येथील नौदल तळावर क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकीही दिली होती. त्यामुळे उत्तर इस्रायलमध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे.
अमेरिकेने या युद्धाला “एपिक फ्युरी” असे नाव दिले असून, या कारवाईत 50 हजारांहून अधिक अमेरिकन सैनिक सहभागी असल्याचे सांगितले आहे. अमेरिकेच्या दाव्यानुसार, 17 इराणी जहाजे नष्ट करण्यात आली असून त्यात एका पाणबुडीचाही समावेश आहे. सुमारे 200 लढाऊ विमाने, दोन विमानवाहू जहाजे आणि बॉम्बफेकी विमाने या मोहिमेत कार्यरत आहेत. इराणच्या हवाई संरक्षण प्रणाली, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यंत्रणेला मोठा फटका बसल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
याउलट, (IRGC) ने पहिल्या दोन दिवसांत सुमारे 650 अमेरिकन सैनिक मारले किंवा जखमी केल्याचा दावा केला आहे. चिनी वृत्तसंस्था Xinhua News Agency च्या माहितीनुसार, IRGC ने अमेरिकन नौदलाच्या पाचव्या फ्लीट मुख्यालयासह बहरीनमधील लष्करी तळांवर अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचे सांगितले आहे. तसेच अमेरिकेच्या एका लष्करी जहाजाचे मोठे नुकसान केल्याचाही दावा करण्यात आला आहे.
युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने सुमारे 300 इराणी क्षेपणास्त्र लाँचर नष्ट केल्याचे म्हटले आहे. या लक्ष्यांमध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आणि हवाई संरक्षण यंत्रणांचा समावेश आहे. इस्रायली हवाई दलाच्या मते, हे हल्ले इराणची क्षेपणास्त्र क्षमता कमकुवत करण्यासाठी करण्यात येत आहेत. दरम्यान, सौदी अरेबियाने त्यांच्या हवाई क्षेत्रात घुसणारे नऊ इराणी ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे.
अमेरिकन आर्मी सेंट्रल कमांडचे प्रमुख ब्रॅड कूपर यांच्या मते, अमेरिकेने आतापर्यंत इराणमधील सुमारे 2000 लक्ष्यांवर हल्ले केले आहेत. या व्यापक कारवाईत प्रचंड प्रमाणात हवाई आणि सागरी शक्तीचा वापर करण्यात येत आहे, ज्यामुळे मध्यपूर्वेतील संघर्षाचे रूपांतर मोठ्या प्रादेशिक युद्धात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



