Home Cities जळगाव कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा मुद्दा अधिवेशनात मांडणार; आ. भोळेंचे आश्वासन

कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा मुद्दा अधिवेशनात मांडणार; आ. भोळेंचे आश्वासन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कोविड काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आता पुन्हा एकदा राजकीय पातळीवर हालचाल सुरू झाली आहे. आमदार राजूमामा भोळे यांनी कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडण्याचे आश्वासन दिले आहे.

जनसेवा विचारधारा फाऊंडेशनच्या वतीने २ मार्च २०२६ रोजी आमदार भोळे यांना निवेदन देण्यात आले. कोविड-१९ महामारीच्या काळात कंत्राटी स्वरूपात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कंत्राटी तत्त्वावर कायमस्वरूपी सामावून घ्यावे, अशी प्रमुख मागणी या निवेदनातून करण्यात आली.

कोविडच्या भीषण काळात रुग्णांच्या जवळ जाण्यास नातेवाईकही धजावत नसताना वॉर्डबॉय (कक्षसेवक), बेड सहाय्यक, डॉक्टर, नर्सेस, ॲम्ब्युलन्स चालक, आया, डेटा एन्ट्री ऑपरेटर आदी कर्मचाऱ्यांनी स्वतःचा व कुटुंबाचा जीव धोक्यात घालून सेवा बजावली. केंद्र व राज्य शासनाने त्या काळात या ‘कोविड योद्ध्यांचा’ गौरव व सन्मानही केला होता. मात्र, कोरोनाची लाट ओसरल्यानंतर या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

राज्याच्या आरोग्य विभागासह विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये सध्या मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, तहसील कार्यालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, रेल्वे विभाग, बसस्थानके, शाळा-महाविद्यालये तसेच काही खाजगी संस्थांमध्येही मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर कोविड काळात काम केलेल्या अनुभवी कंत्राटी कर्मचाऱ्यांना नव्याने कंत्राटी तत्त्वावर कायमस्वरूपी संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा केली असून अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन निवेदनकर्त्यांना दिले.

या प्रसंगी निलेश बोरा व रमेश वानखेडे उपस्थित होते. तसेच निलेश बोरा, रमेश वानखेडे, प्रेम वानखेडे, बबन सावळे, विनोद सपकाळे, युवराज सुरवाडे, कृष्णा सावळे आणि हेमंत बिऱ्हाडे यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या.


Protected Content

Play sound