Home आंतरराष्ट्रीय अमेरिकेकडून इराणवर थेट हल्ल्यांसाठी सैनिकांना सज्ज राहण्याचे निर्देश

अमेरिकेकडून इराणवर थेट हल्ल्यांसाठी सैनिकांना सज्ज राहण्याचे निर्देश


वॉशिग्टन-वृत्तसेवा | मध्यपूर्वेतील तणावाने आता भीषण युद्धाचे रूप धारण केले असून अमेरिका–इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष उघडपणे पेटला आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल ब्रॅड कूपर यांनी तब्बल ५० हजार सैनिकांना गुप्त संदेश पाठवल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकन सैन्य अधिकृतपणे मैदानात उतरणार असल्याने जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. तज्ज्ञांनी या संघर्षाचे रूपांतर तिसऱ्या महायुद्धात होण्याची भीती व्यक्त केली आहे.

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी पाठवण्यात आलेल्या संदेशात जनरल कूपर यांनी सैनिकांना थेट कारवाईस सज्ज राहण्याचे निर्देश दिल्याचे समजते. “आता थांबण्याची किंवा विचार करण्याची वेळ नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगत युद्धासाठी केलेल्या सरावानंतर प्रत्यक्ष कारवाईची वेळ आल्याचे त्यांनी नमूद केल्याची माहिती आहे. १९७९ पासून इराणने हजारो अमेरिकन नागरिकांना लक्ष्य केल्याचा दावा करत, या मोहिमेद्वारे चोख प्रत्युत्तर दिले जात असल्याचे ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या सैनिकांना शत्रूविरुद्ध अत्यंत कठोर आणि निर्णायक कारवाई करण्याचे आवाहन केल्याचे वृत्त आहे. सैनिकांना “स्वतंत्र जगाची ढाल आणि सर्वात वेगवान तलवार” असे संबोधत त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान, इराण आणि इस्रायलदरम्यान ड्रोन हल्ल्यांचा वर्षाव सुरू असून अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज घुमत आहेत.

इराणचे सर्वोच्च नेते Ayatollah Ali Khamenei यांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या भावनेतून इराण अधिक आक्रमक झाल्याचे सांगितले जात आहे. Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) ने अमेरिका आणि इस्रायलविरोधात मोठी रणनीती आखल्याची माहिती आहे. मध्यपूर्वेतील अमेरिकन दूतावास आणि लष्करी तळांना लक्ष्य करून हल्ल्यांची मालिका सुरू असल्याचे वृत्त समोर येत आहे.

या संघर्षाचा परिणाम केवळ युद्धभूमीपुरता मर्यादित न राहता जागतिक पातळीवर जाणवत आहे. आंतरराष्ट्रीय विमानवाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली असून जागतिक बाजारपेठांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. हजारो नागरिक युद्धाच्या छायेत अडकले असून सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

मध्यपूर्वेतील ही धग आता व्यापक जागतिक संकटात रूपांतरित होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवसांत या संघर्षाची दिशा काय असेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound