राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जवान भूषण सुभाष परदेशी यांना ऊनपदेव-वर्डी मार्गावर मध्य प्रदेश निर्मित अवैध मद्याची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार २ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास संबंधित ठिकाणी सापळा रचण्यात आला. महेंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MP-46-ZD-8454) मधून मद्यविक्री सुरू असताना पथकाने अचानक धाड टाकत वाहनाची झडती घेतली आणि अवैध मद्यसाठा जप्त केला.
या कारवाईदरम्यान माउंट ६००० स्ट्रॉन्ग बिअरच्या ३६६ बाटल्या किंमत ४२ हजार ९० रुपये, टँगो पंच या बनावट देशी दारूच्या ५३५ बाटल्या किंमत ३२ हजार ३२० रुपये आणि रॉयल स्टॅगच्या २४ बाटल्या किंमत ६ हजार रुपये असा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय सुमारे ७ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप आणि दोन प्लास्टिक टबही जप्त करण्यात आले. एकूण मुद्देमालाची किंमत ७ लाख ८१ हजार ०१० रुपये इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. विठ्ठल टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जळगाव भरारी पथकाचे निरीक्षक अशोक पी. तारू, दुय्यम निरीक्षक योगेश सूर्यावंशी, जवान नरेंद्र पाटील, राहुल सोनवणे व महिला जवान पुनम पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला. तसेच चोपडा विभागाचे निरीक्षक अब्दुल कैय्युम सु. मोमीन, दुय्यम निरीक्षक निकिता खपके, जवान विपुल राजपूत, भूषण परदेशी, कुणाल सोनावणे, नितीन पाटील आणि दिनेश पाटील यांचाही पथकात समावेश होता.
या प्रकरणी अत्तरसिंग मांगिलाल बारेला (वय २७) आणि विकास बिरसिंग बारेला (वय २९), रा. मुळया उतार, ता. चोपडा यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास निरीक्षक ए. के. सु. मोमीन करीत आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा विभागाने दिला आहे.