Home Cities चाळीसगाव उबाठाला हादरा : उन्मेष पाटील शिवसेनेत जाणार; प्रवेशाचा मुहुर्तही ठरला !

उबाठाला हादरा : उन्मेष पाटील शिवसेनेत जाणार; प्रवेशाचा मुहुर्तही ठरला !


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात आधीच मोठ्या प्रमाणात कमकुवत असलेल्या शिवसेना-उबाठा पक्षाला मोठा हादरा बसला असून माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चीत केले असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

गत लोकसभा निवडणुकीच्या आधी जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना घडली होती. तत्कालीन खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपला जय श्रीराम करून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला होता. याप्रसंगी त्यांच्या सोबत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण बाळासाहेब पाटील यांनी देखील प्रवेश घेतला होता. करण पाटील यांना पक्षातर्फे लोकसभेचे तिकिट मिळाले असता त्यांना पराभवाचा धक्का बसला.

यानंतर विधानसभेत उन्मेष पाटील यांचा मंगेश चव्हाण यांनी दारूण पराभव केला. यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीत चाळीसगावमध्ये पक्षाला चांगली कामगिरी करता आली नाही. जिल्ह्यातही एकूणच पक्षाचा परफॉर्मन्स समाधानकारक राहिला नाही. तर अलीकडेच झालेल्या जळगाव महापालिका निवडणुकीतही पक्षाची धुळधाण झाली.

या पार्श्वभूमिवर, माजी खासदार आणि माजी आमदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. चाळीसगावमध्ये आधीपासून शिवसेनेची ताकद मर्यादीत आहे. आजूबाजूच्या मतदारसंघात (पाचोरा व पारोळा ) येथे शिवसेना मजबूत असतांना चाळीसगावात भाजपचे एकछत्री वर्चस्व दिसून येत आहे. यामुळे उन्मेष पाटील यांच्या आगमनाने शिवसेनेला एक खंदा शिलेदार मिळणार आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या आगमनाचा लाभ होण्याची शक्यता आहे.

भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष महायुतीचे घटक असले तरी अनेक मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षात वर्चस्वाची मोठी लढाई आहे. यात प्रामुख्याने पाचोरा, मुक्ताईनगर, चोपडा आदींचा समावेश आहे. नगरपालिका निवडणुकीच्या आधी अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी हे भाजपमधून शिवसेनेत दाखल झाले आणि त्यांनी नगरपालिकेत विजय देखील संपादन केला. तेथे आता शिवसेनेची स्थिती मजबूत बनली आहे. आता चाळीसगावात देखील शिवसेनेने ताकद वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला असून उन्मेष पाटील यांच्या एंट्रीमुळे याला बळ मिळण्याची शक्यता आहे.

तर पारोळ्यात देखील करण पवार हे शिवसेनेत एंट्री करणार का ? याची आता सर्वांना उत्सुकता लागली आहे. अर्थात, या सर्व राजकीय घडामोडींमुळे शिवसेना-उबाठा पक्षाला जोरदार धक्का बसला हे कुणालाही नाकारता येणार नाही.


Protected Content

Play sound