
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय येथे आयोजित ‘कृषीविश्व २०२६’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. चार दिवस विविध स्पर्धा, उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी महाविद्यालय परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांच्या हस्ते औक्षण, रिबीन कापून, प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी डॉ. पी. आर. सपकाळे, डॉ. ए. पी. चौधरी (शिक्षण व संशोधन संचालक, गोदावरी कृषी संकुल), मोहन सूर्यवंशी (प्रशासकीय अधिकारी) तसेच उपप्राचार्य प्रा. पी. एस. देवरे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. शैलेश तायडे यांनी अशा स्नेहसंमेलनांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळते व व्यक्तिमत्त्व विकासाला बळ मिळते, असे सांगत आयोजन समितीचे विशेष कौतुक केले.
पहिल्या दिवशी मंडला आर्ट, पोस्टर मेकिंग, वन मिनिट टास्क, अंताक्षरी आदी स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वन मिनिट टास्क स्पर्धेत महेश पाटील व दिशा वाघ विजेते ठरले. मंडला आर्ट व पोस्टर स्पर्धेत कृष्णराज सोनवणे प्रथम, नेत्रा खराटे द्वितीय व दिशा वाघ तृतीय क्रमांकावर राहिले.
दुसऱ्या दिवशी ग्रुप डे, ट्विन डे, रांगोळी, म्युझिकल चेअर व दोरखेच (टग ऑफ वॉर) स्पर्धा घेण्यात आल्या. म्युझिकल चेअर स्पर्धेत आरती वालवी, भावना दलाल व राज कुरे यांनी यश संपादन केले. रांगोळी स्पर्धेत दिशा वाघ प्रथम, यश पवार व समूह द्वितीय तर प्रियांका गावित तृतीय ठरली.
तिसऱ्या दिवशी ‘बॉलिवूड डे’ आणि ‘फिश पाँड’ कार्यक्रमांनी रंगत आणली. रॅम्प वॉक स्पर्धेत श्रुस्ती डोंगरे प्रथम व पूर्वजा कुमावत द्वितीय ठरल्या. चौथ्या दिवशी नृत्य, नाटिका, माइम, गीत गायन व मिमिक्री स्पर्धांनी स्नेहसंमेलनाचा उत्साह शिगेला पोहोचवला. एकल नृत्यात श्रुस्ती डोंगरे प्रथम व साक्षी बहेकर द्वितीय ठरल्या. समूह नृत्यात युगल धाके व समूह विजेते तर हिटर्स समूह उपविजेते ठरले. माइम स्पर्धेत ७/१२ समूह प्रथम आला, तर नाटिका स्पर्धेत तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. मिमिक्रीमध्ये अमोड अख्तर प्रथम व नीरज सोनवणे द्वितीय ठरले. गीत गायन स्पर्धेत धीरज खेडकर प्रथम तर उदय माळी उपविजेता ठरला.
समारोप समारंभ प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय बाविस्कर (मुख्य कार्यकारी अधिकारी) व डॉ. ए. पी. चौधरी उपस्थित होते. विजेत्या विद्यार्थ्यांना चषक, पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. एस. एन. पाटील तसेच प्राध्यापकवर्गाने मोलाचे मार्गदर्शन केले. समारोपानंतर आयोजित डीजे नाईटमुळे स्नेहसंमेलनाचा जल्लोष अधिकच रंगला.



